कोलकातामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मेट्रो स्टेशन केलं बंद; ७ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:24 AM2024-08-28T10:24:20+5:302024-08-28T10:24:51+5:30

BJP And Nabanna Protest : भाजपाने आज १२ तासांच्या बंगाल बंदची हाक दिली आहे. नबन्ना अभियानादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.

bjp bandh west bengal nabanna protest mamata banerjee kolkata kar hospital | कोलकातामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मेट्रो स्टेशन केलं बंद; ७ जणांना अटक

कोलकातामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मेट्रो स्टेशन केलं बंद; ७ जणांना अटक

कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या प्रदर्शनाला 'नबन्ना अभियान' असं नाव देण्यात आलं आहे. आज बंगालमध्ये तणाव पाहायला मिळत आहे. भाजपाने आज १२ तासांच्या बंगाल बंदची हाक दिली आहे. बुधवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे. 

नबन्ना अभियानादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. मात्र ममता बॅनर्जी यांनी बुधवारी बंद होणार नाही. सरकारी कर्मचारी कार्यालयात न आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्टपणे म्हटलं आहे. तसेच आज ज्युनिअर डॉक्टरांचाही संप आहे. बंगालमधील भाजपा बंददरम्यान नादियामध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

भाजपाच्या बंगाल बंदमध्ये मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. याच दरम्यान, कोलकाता येथील श्यामबाजार मेट्रो स्टेशनचे गेट भाजपा कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सात जणांना अटक केली आहे. तसेच अलीपुरद्वारमध्ये आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. नबन्नाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपाने १२ तासांच्या बंदची हाक दिली आहे.

बंगालमधील उत्तर दिनाजपूरमध्ये भाजपाच्या बंगाल बंददरम्यान जाळपोळ झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचवेळी मुर्शिदाबादमध्ये भाजपा समर्थकांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याने मोठा गोंधळ झाला. या काळात हावडामध्ये अनेक ठिकाणी बसचालक हेल्मेट घालून गाडी चालवताना दिसले. अशाच एका ड्रायव्हरने सांगितले की आज बंद आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तो हेल्मेट घालून काम करत आहे. गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 


 

Web Title: bjp bandh west bengal nabanna protest mamata banerjee kolkata kar hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.