भाजपाने रचला इतिहास; ३८ वर्षांत पहिल्यांदाच राज्यसभेत 'नंबर वन', पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 10:00 AM2018-03-24T10:00:44+5:302018-03-24T10:00:44+5:30
एकूण २४५ सदस्यांच्या राज्यसभेत बहुमतासाठी १२६ चा आकडा गाठणं आवश्यक आहे. मात्र, भाजपा आणि मित्रपक्षांच्या सदस्यांची एकत्रित संख्या त्यापेक्षा कमी आहे.
नवी दिल्लीः राज्यसभेच्या २६ जागांसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानात सर्वाधिक १२ जागा जिंकून भाजपाने इतिहास रचला आहे. पक्षाच्या स्थापनेनंतर ३८ वर्षांत पहिल्यांदाच भाजपा हा राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. परंतु, अजूनही मोदी सरकार - अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बहुमतापासून दूर आहे.
राज्यसभेत आता भाजपाचे ६९ खासदार झाले आहेत, तर काँग्रेस सदस्यांची संख्या ५० आहे. एकूण २४५ सदस्यांच्या राज्यसभेत बहुमतासाठी १२६ चा आकडा गाठणं आवश्यक आहे. मात्र, भाजपा आणि मित्रपक्षांच्या सदस्यांची एकत्रित संख्या त्यापेक्षा कमी आहे. हे 'टार्गेट' पूर्ण करण्यासाठी मोदी-शहा जोडीला भविष्यातही बरीच कसरत करावी लागणार आहे.
शुक्रवारी सात राज्यांमध्ये राज्यसभेच्या २६ जागांसाठी मतदान झालं. त्यात भाजपाला १२, काँग्रेसला पाच, तृणमूल काँग्रेसला चार, जदयूला एक आणि तेलंगणा राष्ट्र समितीला तीन जागा मिळाल्या. या वर्षाचा विचार करायचा झाल्यास, राज्यसभेच्या १७ राज्यांमधील ५९ जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी, ३३ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यापैकी भाजपाचे १६ जण होते. म्हणजेच, वर्षभरात भाजपाचे २८ खासदार राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
राज्यसभेच्या उत्तर प्रदेशातील नऊ जागा भाजपाने जिंकून दाखवल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा धमाका केला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजपाचे सर्व नऊ उमेदवार राज्यसभेवर निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लागलं होतं. पण सपाच्या पदरात एक जागा पडली व बसपाच्या उमेदवाराचा पराभव झाला.
Congratulations to all those elected to the Rajya Sabha from various states and best wishes for their Parliamentary career. I hope they effectively voice the aspirations of the states they will represent.
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2018