ईडी, सीबीआयच्या छाप्यांमागे भाजपचा हात; संतप्त तेजस्वी यादव यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 07:13 AM2023-05-21T07:13:05+5:302023-05-21T07:13:25+5:30
एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्क पाटणा : रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीनप्रकरणी ईडीने गुरूवारी दिल्लीतील माजी मुख्यमंत्री राबडी देवी ...
एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क पाटणा : रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीनप्रकरणी ईडीने गुरूवारी दिल्लीतील माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची मुख्यालयात तब्बल ४ तास चौकशी केली. यादरम्यान राबडी देवी यांना तेजस्वी यादव यांच्या खात्यात किती पैसे गेले, असा प्रश्न विचारण्यात आला. आम्ही सत्तेत आलो की भाजप असे काही करणार हे आम्ही आधीच सांगितले होते, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केली आहे.
'तुमच्या आईला गुरुवारी दिल्लीत सीबीआयने तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले, असा प्रश्न विचारला असता, 'हे सर्वाना माहीत आहे की भाजपचे लोक जाणूनबुजून सीबीआय आणि ईडीचे छापे घालत आहेत. आमच्याकडे तर ते इतक्या वेळा आले की आता लक्षातही नाही. पण आतापर्यंत त्यांना काहीही आढळले नाही. देशातील बिघडलेली स्थिती पाहता भाजप काहीही करू शकते. असे ते म्हणाले.
कर्नाटकातील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन करताना तेजस्वी म्हणाले की, हा भाजपसाठी एक धडा आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचे यापेक्षा वाईट हाल होणार आहेत, असा दावाही त्यांनी केला. आरोपपत्रात अद्याप माझे नाव नाही, परंतु पुरवणी आरोपपत्रात माझे नाव आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. बिहारमध्ये आमचे सरकार आल्यापासून हे लोक त्रस्त आहेत. यामुळे प्रत्येक जण कामाला लागला आहे, असे ते म्हणाले.