बिहारमध्ये नितीश कुमारांवरच भाजपचा विश्वास; तरी आमदारांच्या कामाचे होणार मुल्यमापन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 12:45 PM2020-02-24T12:45:14+5:302020-02-24T12:46:52+5:30
राज्यात विरोधी पक्ष आता विभक्त दिसत असले तरी निवडणुकीच्या काळात भाजपला विरोध कऱण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून काळजी घेण्यात येत आहे.
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पुढील तीन महिने आपल्या सर्व आमदारांच्या कार्याचा अहवाल तयार करणार आहे. ज्या ठिकाणी आमदाराविरोधात वातावरण असेल तिथे नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला बिहारमधील निवडणुकीची काळजी सतावत आहे. त्यामुळे ही योजना करण्यात आली आहे.
बिहारमध्ये भाजपला मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेडची साथ मिळालेली आहे. नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविण्यासाठी भाजप पूर्णपणे तयार आहे. मात्र संघटनात पक्षाला कमकुवत होऊ द्यायचे नाही, असं धोरण भाजप राबवत आहे. त्यासाठी आमदारांच्या कार्याचा अहवाल तपासला जाणार आहे.
बिहारमध्ये जदयू आणि लोक जनशक्ती पार्टी यांच्यासोबत युती असताना देखील विधानसभा निवडणुकीची लढत खडतर होऊ शकते, असा अंदाज भाजपमधून व्यक्त कऱण्यात येत आहे. राज्यात विरोधी पक्ष आता विभक्त दिसत असले तरी निवडणुकीच्या काळात भाजपला विरोध कऱण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून काळजी घेण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील अनुभव भाजपच्या पाठिशी
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत निवडणूक लढवूनही भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सावध झाला आहे. बिहारमध्ये काहीही झालं तरी मुख्यमंत्री नितीश कुमार हेच होतील, असं भाजपने निश्चित केले आहे. मात्र भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे भाजप पक्ष संघटनेवर परिणाम होऊ देणार नसल्याचे दिसत आहे. निवडणुकीत भाजपला जदयूच्या तुलनेत कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.