पाच राज्यांत उमेदवार देण्यावरून भाजपचे मंथन; दिल्लीत महत्त्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 05:47 AM2023-09-29T05:47:40+5:302023-09-29T05:48:41+5:30
निवडणूक समितीची ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक होणार
हरिश गुप्ता
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक दिल्लीत ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या बैठकीत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांतील निवडणुकांविषयी चर्चा होणार आहे. मध्य प्रदेशातील उमेदवारांच्या दोन आणि छत्तीसगडमधील एक यादी जाहीर झाली आहे. मात्र, भाजपचे तीन केंद्रीय नेते दोन दिवस जयपूरला जाऊनही उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकलेली नाही.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सरचिटणीस बी. एल. संतोष हे राजस्थान, मध्य प्रदेशसह इतर तीन राज्यांच्या आगामी निवडणुकीसाठीची रणनीती तयार करण्यासाठी जयपूरमध्ये होते. मात्र, विधानसभांच्या या निवडणुकांत केंद्रीय मंत्री, लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांसह सर्व प्रमुख नेत्यांना उभे करायचे की नाही याबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. तसेच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनाही उमेदवारी द्यायची की नाही, याबाबतही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, केंद्रीय नेत्यांनी सर्वांची स्वतंत्रपणे आणि एकत्र भेट घेतली आहे. पक्षाचा चेहरा म्हणून स्थान मिळत नसल्याने वसुंधरा राजे या नाराज आहेत. मात्र, ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि अर्जुन राम मेघवाल यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न हायकमांडने चालवले आहेत. याशिवाय, खासदार डॉ. किरोडीलाल मीना, दिया कुमारी, राजवर्धन राठोड आणि सुखवीर सिंग जौनपुरिया हे देखील प्रमुख पदांच्या शर्यतीत आहेत.
दरम्यान, वसुंधरा राजे यांना प्रोजेक्ट करावे अशी हायकमांडची मन:स्थिती नाही. मात्र, दोनवेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या सिंधीया यांना नाराज करणेही शक्य नसल्याचे दिसते. त्यामुळे ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय समितीच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या यादीवर चर्चा होऊ शकते.
ऑक्टोबरच्या दुसऱ्या निवडणुकांची घोषणा
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कधीही पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते. नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत व डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या सर्व राज्यांत नवी सरकारे स्थापन होतील. निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना सणवारांच्या तारखाही लक्षात घ्याव्या लागत आहेत. दसरा, दिवाळी, छठ पूजेसह अनेक महत्त्वाचे सण या काळात येणार आहेत.