'या' कारणांमुळे भाजपाने तोडली पीडीपीसोबतची युती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 03:00 PM2018-06-19T15:00:17+5:302018-06-19T15:34:45+5:30
ही युती तुटण्यासाठी गेल्या काही दिवसांतील तात्कालिक घडामोडी कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते.
श्रीनगर: भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजपा बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यावेळी राम माधव यांनी राज्यातील गेल्या तीन वर्षांतील अपयशाचे सर्व खापर मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रॅटिक (पीडीपी) पक्षावर फोडले. भाजपाच्या या अनपेक्षित निर्णयाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. मात्र, ही युती तुटण्यासाठी गेल्या काही दिवसांतील तात्कालिक घडामोडी कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते.
केंद्र सरकारकडून रमजानच्या महिन्यात काश्मीरमध्ये शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधातील सर्व कारवाया थांबवण्यात आल्या होत्या. ही मुदत काल संपुष्टात आली आणि लष्कराच्या ऑल आऊट मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली. मात्र, पीडीपीने शस्त्रसंधीची ही मुदत आणखी काही काळ वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, भाजपाने या मागणीला केराची टोपली दाखवत लष्कराला काश्मीरमध्ये पुन्हा फ्री हँड दिला होता.
याशिवाय, राम माधव यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पीडीपीशी युती तोडण्याच्या निर्णयामागील आणखी काही कारणे सांगितली. तीन वर्षात आम्ही पीडीपीसोबत राज्यातील कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, गेल्या काही काळापासून काश्मीर खोऱ्यातील कट्टरतवादी घटकांचा प्रभाव आणि अशांतता वाढतच आहे. संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमुळे काश्मीरमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्यादृष्टीने पोषक वातावरण राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी सर्वस्वी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती कारणीभूत आहेत, असे आमचे म्हणणे नाही. आम्हाला त्यांच्या हेतुंविषयी कोणतीही शंका नाही. मात्र, काश्मीरमध्ये शांतता राखण्यात त्यांना अपयश येत आहे, हेच वास्तव आहे. राज्याच्या विकासाबाबतही हीच अडचण आहे. भाजपाच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांच्या माध्यमातून ते जम्मू-काश्मीरचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, सरतेशेवटी सर्व अधिकार मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे असल्याने त्यामध्ये अनेक अडचणी येत असल्याचे राम माधव यांनी सांगितले.