...म्हणून आज पश्चिम बंगालमधले बस चालक हेल्मेट घालून करताहेत ड्रायव्हिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 10:04 AM2018-09-26T10:04:46+5:302018-09-26T10:10:55+5:30
सरकारी बसेसच्या चालकांकडून ड्रायव्हिंग करताना हेल्मेटचा वापर
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानं आज भाजपानं राज्यात बंदची हाक दिली आहे. या बंददरम्यान अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रोखून धरल्या आहेत. आंदोलकांनी सरकारी बसेसवर दगडफेक केली आहे. त्यामुळे बस चालक हेल्मेट घालून ड्रायव्हिंग करत आहेत.
उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीदरम्यान दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध म्हणून आज भाजपानं पश्चिम बंगालमध्ये बंदची हाक दिली. हा बंद 12 तासांचा असणार आहे. बंदमध्ये सहभागी झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करण्यासाठी हावडा वर्धमान मार्गावरील रेल्वे गाड्या रोखल्या. याशिवाय सियालदाह-बारासत-बोनगाव सेक्शन दरम्यानची रेल्वे वाहतूकदेखील रोखून धरली.
आंदोलकांनी कूच बेहरमध्ये अनेक सरकारी बसेसवर दगडफेक केली. त्यामुळे बसेसच्या काचा फुटून मोठं नुकसान केलं. यानंतर बस चालकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून हेल्मेट घालून बस चालवण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे. भाजपाकडून सध्या पश्चिम बंगालमध्ये हात-पाय पसरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपा अध्यक्ष अमित शहांनी पश्चिम बंगालचा दौरा करुन नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.