५०० कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत भाजप उमेदवार कॅप्टन अभिमन्यू; पाहा वार्षिक कमाई किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:59 AM2024-09-11T11:59:16+5:302024-09-11T11:59:40+5:30
Haryana Assembly Election 2024 : कॅप्टन अभिमन्यू यांच्याजवळ ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यामध्ये शेअर्स आणि बाँड्स आहेत.
Haryana Assembly Election 2024: हरियाणाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अभिमन्यू यांनी मंगळवारी नारनौंद विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कॅप्टन अभिमन्यू हे राज्यातील सर्वात श्रीमंत नेते आहेत. त्यांच्याकडे ५०० कोटींहून अधिक संपत्ती आहे. ते पहिल्यांदा नारनौंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये जेजेपीच्या राम कुमार गौतम यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता ते पुन्हा एकदा नारनौंद मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
कॅप्टन अभिमन्यू यांच्याजवळ ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यामध्ये शेअर्स आणि बाँड्स आहेत. कॅप्टन अभिमन्यू यांच्याकडे २५० कोटी रुपयांचे शेअर्स असून त्यांच्या पत्नीकडे ७९.०३ कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. याशिवाय, त्यांच्या मुलांकडे ७२.३५ कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्यावर जवळपास ३३ कोटी रुपयांचे कर्जही आहे.
कॅप्टन अभिमन्यू यांची वार्षिक कमाई ३.४५ कोटी रुपये आहे. त्यांची पत्नी एकता यांचे वार्षिक उत्पन्न १.९४ कोटी रुपये आहे. याशिवाय, कॅप्टन अभिमन्यू यांच्याकडे १.११ लाख रुपये रोख, पत्नीकडे १.५८ लाख रुपये रोख आणि मुलांकडे २ लाख रुपये रोख आहेत. तर कॅप्टन अभिमन्यू यांच्या बँक खात्यात १९.५५ लाख रुपये, पत्नीच्या बँक खात्यात १८.७१ लाख रुपये आणि मुलांच्या खात्यात ३.८६ लाख रुपये जमा आहेत.
अनेक कंपन्यांचे संस्थापक आहेत अभिमन्यू
कॅप्टन अभिमन्यू हे अनेक कंपन्यांचे संस्थापक, मालक, संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे २.५१ अब्ज रुपयांचे शेअर्स आणि बाँड्स आहेत आणि त्यांच्या पत्नीकडे ७९.०३ कोटी रुपयांचे शेअर्स आणि बॉण्ड्स आहेत. याशिवाय, त्यांच्या मुलांकडे ७२.३५ कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. तसेच, त्यांच्याकडे २१.५३ लाख रुपयांचे दागिने आहेत, त्यांची पत्नी एकता यांच्याकडे २.२६ कोटी रुपये आणि त्यांच्या मुलांकडे १०.४७ कोटी रुपयांचे दागिने आहेत. कॅप्टन अभिमन्यू यांची एकूण संपत्ती २.८० अब्ज रुपये आणि त्याच्या पत्नीची संपत्ती ८८.८७ कोटी आणि मुलांची संपत्ती ७४.४७ कोटी रुपये आहे.