हरियाणात भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, दोन मुस्लिम चेहऱ्यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 04:24 PM2024-09-10T16:24:55+5:302024-09-10T16:26:11+5:30
Haryana BJP Candidates Second List : दुसऱ्या यादीत २१ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
Haryana BJP Candidates Second List : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत २१ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दोन मुस्लीम उमेदवारांनाही तिकीट देण्यात आले आहे. आतापर्यंत भाजपने हरियाणातील ९० पैकी ८८ जागांसाठी उमेदवार घोषित केले आहे. पहिल्या यादीत ६७ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले होते. अद्याप दोन जागांवर उमेदवारी घोषित करणे बाकी आहे.
भाजपने फिरोजपूर झिरका मतदारसंघातून नसीम अहमद आणि पुन्हाणा मतदारसंघातून एजाज खान यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय, जुलाना जागेवर भाजपने कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर कुस्तीपटू विनेश फोगट काँग्रेसच्या तिकीटावर येथून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने पेहोवा जागेवर उमेदवार बदलला आहे. याआधी भाजपने कंवलजीत सिंह अजराना यांना तिकीट दिले होते. मात्र, विरोध असल्याने त्यांनी तिकीट परत केले. आता भाजपने या जागेसाठी जय भगवान शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ही यादी जाहीर झाल्यानंतर तिकीट मिळाले नाही, म्हणून भाजपचे अनेक नेते पक्षावर कमालीचेच नारज असल्याचे दिसून आले. तसेच, काही नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. निडणुकीपूर्वी नेतेच नाराज झाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर पक्षाने समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. हरियाणामध्ये एकूण ९० जागा आहेत. या ठिकाणी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
भाजपच्या दुसऱ्या यादीतील मतदारसंघ आणि उमेदवार...
- नारायणगड - श्री पवन सैनी
- पेहोवा- जय भगवान शर्मा (डीडी शर्मा)
- पुंडरी - सतपाल जांबा
- असांध - योगेंद्र राणा
- गणौर - देवेंद्र कौशिक
- राई - कृष्णा गेहलावत
- बरोदा - प्रदीप सांगवान
- जुलाना - कॅप्टन योगेश बैरागी
- नरवाना (SC)- कृष्णकुमार बेदी
- डबवाली - सरदार बलदेवसिंग मलियाना
- एलेनाबाद - अमीर चंद मेहता
- रोहतक - मनीष ग्रोवर
- नारनौल - ओम प्रकाश यादव
- बावल (अजा) - डॉ. कृष्ण कुमार
- पटौदी (अजा) - बिमला चौधरी
- नूंह - संजय सिंह
- फिरोजपुर झिरका - नसीम अहमद
- पुन्हाना - ऐज़ाज़ खान
- हथिन - मनोज रावत
- होडल (अजा) - हरिंदर सिंह रामरतन
- बड़खल - धनेश अदलखा