'...तर ११ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करू'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 03:43 PM2020-01-30T15:43:36+5:302020-01-30T15:56:05+5:30
भाजपा उमेदवार तेजिंदरसिंग पाल बग्गा यांचं विधान
नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त कालावधीपासून आग्नेय दिल्लीतल्या शाहीन बागेत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर भाजपाच्या अनेक नेत्यांनी टीका केली आहे. आता भाजपाच्या उमेदवारानं शाहीन बागेत थेट सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा दिला आहे. ११ फेब्रुवारीला शाहीन बागेत सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल, असं भाजपा नेते आणि उमेदवार ताजिंदरपाल सिंग बग्गा यांनी म्हटलं आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शाहीन बागेत मुस्लिम महिलांचं आंदोलन सुरू आहे. महिन्याभराहून जास्त कालावधीपासून या महिला आंदोलन करत आहेत. या आंदोलनावर भाजपाच्या अनेक नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. तर भाजपा नागरी मुद्द्यांपासून पळ काढण्यासाठी शाहीन बागेतल्या आंदोलनाचा राजकीय वापर करत असल्याचं प्रत्युत्तर आम आदमी पार्टीकडून देण्यात आलं आहे.
भाजपाचे नेते जनसभांमधून शाहीन बागेतल्या आंदोलनावर टीका करत असताना ताजिंदरपाल सिंग बग्गा यांनी आंदोलकांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर शाहीन बागेत सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल, असा इशारा बग्गा यांनी दिला आहे. शाहीन बागेतल्या आंदोलकांचं समर्थक जंतरमंतरवर भारतीय सैन्याची तुलना पाकिस्तानी सैन्याशी करत असल्याचा एक व्हिडीओ बग्गा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
'भारतीय सैन्य आपल्याच लोकांना मारतं, असं शाहीन बाग आंदोलनाचे समर्थक जंतरमंतरवर म्हणतात. त्यांच्याकडून भारतीय सैन्याची तुलना पाकिस्तानी लष्कराशी केली जाते. शाहीन बाग देशद्रोह्यांचा अड्डा झाली आहे. ११ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर सर्वात आधी या अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल,' असं बग्गा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
याआधी भाजपा नेते परवेश वर्मा यांनी शाहीन बागेतल्या आंदोलनावर भाष्य करताना वादग्रस्त विधान केलं होतं. 'शाहीनबाग हे काश्मीर झालं आहे. भाजपा सत्तेत आली नाही, तर ते तुमच्या घरात घुसतील, तुमच्या मुलीला-बहिणीला उचलून नेतील, त्यांच्यावर बलात्कार करतील आणि मारून टाकतील' असं भाजपा खासदार परवेश वर्मा म्हणाले होते. दिल्लीत भाजपा सत्तेत आल्यास, एका तासात शाहीनबाग रिकामी करू, असंदेखील वर्मा यांनी म्हटलं आहे.