अबब... १८ महिन्यांत १८५ कोटींनी वाढली भाजपा उमेदवाराची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 01:41 PM2019-11-18T13:41:46+5:302019-11-18T13:42:20+5:30

प्रत्येक निवडणुकीगणिक राजकारणी लोकांची संपत्ती कैक पटींनी वाढणे ही आता सामान्य बाब बनली आहे.

BJP candidate's wealth increased by 185 crores in 18 months | अबब... १८ महिन्यांत १८५ कोटींनी वाढली भाजपा उमेदवाराची संपत्ती

अबब... १८ महिन्यांत १८५ कोटींनी वाढली भाजपा उमेदवाराची संपत्ती

Next

बंगळुरू - प्रत्येक निवडणुकीगणिक राजकारणी लोकांची संपत्ती कैक पटींनी वाढणे ही आता सामान्य बाब बनली आहे. कर्नाटकमधील विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान असाच एक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकमधील होसकोटे मतदारसंघातील भाजपा उमेदवार एमटीबी नागराज यांच्याकडील संपत्तीमध्ये १८ महिन्यांत १८५ कोटी रुपयांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. एमटीबी नागराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रामधून ही माहिती समोर आली आहे.

एमटीबी नागराज यांनी २०१८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर होसकोटे मतदारसंघातून विजय मिळवला होता. तसेच काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातील आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. दरम्य़ान या १८ महिन्यांच्या काळात नागराज यांच्या संपत्तीत १८५ कोटींनी वाढ झाली आहे.

 एमटीबी नागराज यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार १८ महिन्यात त्यांची संपत्ती १८५. ७ कोटी रुपयांनी वाढली आहे. शपथपत्रानुसार एप्रिल २०१८ मध्ये त्यांची एकूण संपत्ती १०६३ कोटी रुपये इतकी होती. दरम्यान, बंडखोरी केल्यानंतर नागराज यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना त्यांची अपात्रता कायम ठेवली होती. मात्र त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती.

 दरम्यान, भाजपा प्रवक्ते मधुसुदन यांनी नागराज यांच्या संपत्तीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, नागराज देशातील त्या श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत जे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आपली पत्नी आणि नातेवाईकांची संपत्ती जाहीर करत असतात. नागराज यांनी तीन वेळा कर्नाटक विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. तसेच काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये ते गृहनिर्माणमंत्री होते.

गेल्या दीड वर्षांपासून राजकीय अस्थिरतेचा अनुभव घेत असलेल्या कर्नाटकमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. कर्नाटकमधील विधानसभेच्या १५ जागांसाठी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होत असून,  राज्यातील सरकार टिकवण्यासाठी सध्या सत्तेवर असलेल्या येडियुरप्पा आणि भाजपाला या निवडणुकीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने काँग्रेस आणि जेडीएसमधून बंडखोरी करून पक्षात आलेल्या अपात्र आमदारांना उमेदवारी दिली आहे. मात्र पक्षांतर करून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्याने भाजपामधील अनेक नेते नाराज झाले असून, त्यांच्या नाराजीमुळे पोटनिवडणुकीपूर्वी भाजपाची चिंता वाढली आहे.

Web Title: BJP candidate's wealth increased by 185 crores in 18 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.