Mehbooba Mufti : "गुपकर आघाडीच्या एकजुटीची केंद्र सरकारला भीती," मेहबुबा मुफ्तींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 08:50 AM2022-05-30T08:50:15+5:302022-05-30T09:04:05+5:30
Mehbooba Mufti : गुपकर आघाडीच्या राजकीय पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे आणि सरकारच्या धोरणांचा विरोध करण्याची आवश्यकता असल्याचं वक्तव्य मुफ्ती यांनी केलं.
केंद्र सरकारला गुपकर आघाडीच्या (पीएजीडी) नेत्यांच्या एकजुटीची भीती वाटते, त्यामुळे सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांना का समन्स पाठवले हे समजणे कठीण नसल्याचे वक्तव्य जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर वक्तव्य केले.
“काही बोलण्याची गरज आहे का? फारूख अब्दुल्ला यांना का बोलावण्यात आलं हे समजण्यासाठी तुम्हाला रॉकेट सायन्सची गरज आहे का? भारत सरकारला गुपकर आघाडीची भीती वाटते. आम्ही एकत्र आलो तर जम्मू काश्मीरबाबत त्यांनी भयावह योजना अयशस्वी होईल याची त्यांना भीती आहे,” असं मुफ्ती एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. फारूख अब्दुल्ला हे गुपकर आघाडीचे अध्यक्षदेखील आहेत.
“आम्हाला लोकांमध्ये जाऊन काम करायचं आहे. आम्ही अनेकदा काही गोष्टींचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्या घराचे दरवाजे बंद आहेत, हे तुम्हाला माहित आहे. मला एका जखमी काश्मीरी पंडिताच्या घरी जायचं होतं. परंतु मला परवानगी देण्यात आली नाही. अशा स्थितीत आम्हाला आमची जागा शोधत त्यांचे नापाक मनसुबे उधळून लावायचे आहेत. केंद्र सरकारला आमच्या राजकीय कारवायांची भीती वाटते. त्यांनी आम्हाला बदनाम करायला सर्वकाही केलं,” असंही त्यांनी नमूद केलं.
एकजुटीची गरज
"गुपकर आघाडीच्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करण्याची गरज आहे, कारण ते आमचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतील,” असंही मुफ्ती यावेळी म्हणाल्या. ५ ऑगस्ट २०१९ नंतर दिल्लीतून जे आदेश येत आहेत त्यावरून नोकऱ्या, जमीन, संसाधने विक्रीसाठी आहेत असं दिसतं. जोपर्यंत आम्ही एकजुट होत नाही आणि विरोध करत नाही, तोवर ते आमच्या अस्थित्वाला नष्ट करण्याचे ते प्रयत्न करतील असा आरोपही मुफ्ती यांनी केला.