भागवत काय बोलले माहिती नाही, अमित शहांची चुप्पी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 11:47 AM2018-02-12T11:47:33+5:302018-02-12T11:47:37+5:30
मी भागवत यांचे वक्तव्य अद्याप नीटपणे ऐकलेले नाही.
त्रिपुरा: सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सोमवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी भागवत यांचे वक्तव्य अद्याप नीटपणे ऐकलेले नाही. त्यामुळे मला त्याबाबत नेमकी माहिती नाही, असे सांगत अमित शहा यांनी कानावर हात ठेवले. अमित शहा सध्या त्रिपुराच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याबद्दल विचारणा केली. परंतु, यावर शहा यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
मोहन भागवत यांनी रविवारी मुजफ्फरपूर येथे संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले होते की, आमची सैन्य तयार करण्याची क्षमता आहे. पण ही आमची लष्करी संघटना नाही. तर ही कौटुंबीक संघटना आहे. पण संघात लष्करासारखीच शिस्त आहे. देशाला गरज असेल आणि संविधानाने परवानगी दिली तर आम्ही सीमेवर लढायला तयार आहोत. संघ स्वयंसेवक हसतहसत बलिदान द्यायला तयार आहेत, असे भागवत यांनी सांगितले.
मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. भागवत यांचे वक्तव्य लष्कराचे खच्चीकरण करणारे असून हा लष्कराचा अपमान आहे. त्याबद्दल भागवत यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे राज्य प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप केला. भारतीय सैन्याच्या क्षमतेवर अशाप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. याबद्दल संघाने भारतीय लष्कराची माफी मागितली पाहिजे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.