केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे? जेपी नड्डा यांची कॅबिनेट मंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक; UCC वर सुद्धा चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 11:33 AM2023-07-05T11:33:39+5:302023-07-05T12:05:00+5:30
सर्वात आधी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि भूपेंद्र यादव यांच्यासोबत बैठक सुरू झाली.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांची जोरदार चर्चा आहे. यातच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मंगळवारी दुपारपासून रात्रीपर्यंत अनेक केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतली. सर्वात आधी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि भूपेंद्र यादव यांच्यासोबत बैठक सुरू झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांनी संघटना मंत्री बीएल संतोष यांच्या उपस्थितीत जेपी नड्डा यांची भेट घेतली. ही बैठक प्रामुख्याने संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात, विशेषत: समान नागरी संहिता (UCC) मध्ये उपस्थित करण्यात येणाऱ्या मुद्द्यांवर होती. संसदेत यूसीसी तयारीबाबत सविस्तर चर्चा झाली.
या दोन्ही मंत्र्यांची बैठक आटोपल्यानंतर जेपी नड्डा यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, किरेन रिजिजू यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संसदेत उपस्थित करावयाच्या विषयांवर विशेषत: यूसीसीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच कायदा मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली असल्याने जेपी नड्डा यांनी त्यांच्याशी यूसीसीच्या मुद्द्यावर येणाऱ्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
किरेन रिजिजू यांची भेट घेतल्यानंतर विद्यमान केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी भाजप अध्यक्षांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, जेपी नड्डा यांनी मेघवाल यांच्याशीही यूसीसीशी संबंधित विषयांवर सल्लामसलत केली. दरम्यान, माजी कायदा राज्यमंत्री एसपी सिंह बघेल हेही भाजप मुख्यालयात पोहोचले. शेवटी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजप मुख्यालय गाठून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांची भेट सुमारे तासभर चालली.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात येणार्या विषयांबाबत आणि त्याबाबतच्या ठोस तयारीसाठी आजची बैठक सुमारे ८ तास चालली. आगामी पावसाळी अधिवेशनात यूसीसी आणि एनसीआर विधेयकासारख्या मोठ्या मुद्द्यांवरून संसदेचे वातावरण तापणार आहे, त्यामुळे या सर्व ज्वलंत मुद्द्यांवर भाजपच्या तयारीच्या संदर्भात आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता
पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. पीटीआयने भाजपच्या सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतील, तेव्हा मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शक्यता आहे. २० जुलैपासून सुरू होणार्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यात बंद दाराआड बैठक
राज्यांसह भाजपच्या पक्षामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २८ जून रोजी अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक घेतली होती. संघटनात्मक आणि राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यात बंद दाराआड बैठक झाली होती. कारण मंत्रिमंडळातील कोणताही फेरबदल आगामी विधानसभा निवडणुकीतही परिणामकारक ठरणार आहे.