भाजपाचे मुख्यमंत्री दिल्लीत, राष्ट्रपती निवडणुकीची होणार चर्चा?
By admin | Published: April 23, 2017 11:39 AM2017-04-23T11:39:04+5:302017-04-23T11:39:04+5:30
भाजपाशासित राज्यातील सर्व मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत जमले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - भाजपाशासित राज्यातील सर्व मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत जमले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना संबोधित करणार आहेत तसेत प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मे महिन्यात केंद्र सरकारला सतेत येऊन तीन वर्ष होत आहेत, तसेच राष्ट्रपती पदाची निवडणुकीला काही महिनेच राहिले आहेत अशामध्ये भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीवारीसाठी बोलवल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
आज सांयकाळी सहा वाजता भाजपच्या केंद्रीय कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सर्व मुख्यमंत्र्यांना संबोधित करतील. बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, नगरविकास मंत्री व्यंकया नायडू, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय परिवनहन मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन केल्यानंतर यापूर्वी मुख्यमंत्र्यांची बैठक 27 ऑगस्ट 2016 रोजी झाली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण होण्याअगोदर पुन्हा एकदा बैठक होत आहे. बैठकीत विविध विकास योजनांवर चर्चा केली जाणार असल्याचीही चर्चा आहे.