भाजपाने शब्द पाळला! जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले; भाविकांना दर्शन सुलभ, का होते बंद?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 03:57 PM2024-06-13T15:57:41+5:302024-06-13T15:59:52+5:30

Puri Jagannath Temple: पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे दरवाजे का बंद ठेवण्यात आले होते? भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण केले.

bjp completed promise and all the doors of the puri jagannath temple opened now darshan is easy for devotees | भाजपाने शब्द पाळला! जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले; भाविकांना दर्शन सुलभ, का होते बंद?

भाजपाने शब्द पाळला! जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले; भाविकांना दर्शन सुलभ, का होते बंद?

Puri Jagannath Temple: ओडिशा येथे भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकामागून एक निर्णयांचा धडाका लावल्याचे पाहायला मिळत आहे. ओडिशा येथे विधानसभा आणि लोकसभेच्या एकत्रित निवडणुका पार पडल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मोहनचरण माझी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. निवडणुकीत दिलेले एक आश्वासन पूर्ण करत भाजपाने शब्द पाळला. जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे खुले करण्याची ग्वाही भाजपाने दिली होती. 

ओडिशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे दर्शनासाठी खुले करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला होता. तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर लगेचच जगन्नाथ मंदिराचे सर्व चार दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे मंगला आरतीच्या वेळेस मुख्यमंत्री माझी आणि पुरीचे लोकसभेचे खासदार संबित पात्रा, माजी मंत्री प्रताप सारंगी उपस्थित होते. 

मंदिर व्यवस्थापनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करणार

जगन्नाथ मंदिर विकास आणि अन्य कामांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत फंड जमा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जगन्नाथ मंदिर विकासकामांसाठी तसेच मंदिर व्यवस्थापनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री माझी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुसरीकडे, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत माझी सरकारने शेतकरी आणि महिलांशी संबंधित निर्णयही घेतले. धानाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ३१०० रुपये करण्यासाठी राज्य सरकार पावले उचलणार असून संबंधित विभागाला यासंदर्भात काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी लवकरच समिती स्थापन करण्यात येणार आहे. एमएसपीसह शेतकऱ्यांच्या इतर समस्यांना तोंड देण्यासाठी 'समृद्ध कृषक नीती योजना' करण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरण आणि बालकल्याणासाठी नवीन सरकार १०० दिवसांच्या आत सुभद्रा योजना लागू करेल, ज्याअंतर्गत प्रत्येक महिलेला ५० हजार रुपयांचे कॅश व्हाउचर दिले जाईल. सुभद्रा योजनेच्या अंमलबजावणीसाठी विभागांना मार्गदर्शक तत्त्वे आणि रोडमॅप तयार करण्यास सांगितले आहे. 

जगन्नाथ मंदिराचे दरवाजे का बंद होते?

कोरोना महामारीच्या काळात नवीन पटनायक सरकारने चार पैकी तीन दरवाजे बंद केले होते. कोरोना महामारीचा प्रभाव ओसरल्यानंतर सिंह द्वार येथून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता. तेव्हापासून अन्य दरवाजे बंदच होते. ते अद्यापपर्यंत खुले करण्यात आले नव्हते. माझी सरकारच्या निर्णयानंतर आता अश्व द्वार, व्याघ्र द्वार आणि हस्ति द्वार उघडण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षांपासून ही प्रवेश द्वारे बंद ठेवण्यात आली होती. 

 

Web Title: bjp completed promise and all the doors of the puri jagannath temple opened now darshan is easy for devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.