आसाममध्ये कोणाला मुख्यमंत्री करायचे, यावरून भाजप संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:31 AM2021-05-06T06:31:46+5:302021-05-06T06:32:15+5:30
सोनोवाल की हिमंत बिस्वा सर्मा?
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळविल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोणाला करायचे, या मुद्द्यावरून भाजप द्विधा मन:स्थितीत आहे. त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सर्वनंद सोनोवाल यांना बाजूला सारून हिमंत बिस्वा सर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात येईल अशी चर्चा होती; पण सोनोवाल यांना दुखावले तर आसाममध्ये भाजपला ते महागात पडू शकते, अशी चिन्हे दिसत आहेत.
आसाममधील निवडणुकांनंतर भावी मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर भाजपने प्रचारादरम्यानही कधीच दिले नाही. हिमंत बिस्वा सर्मा यांच्या गटाच्या दबावामुळे असे प्रश्न भाजप नेहमीच टाळत आला आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत आसाममध्ये एनडीएला मिळालेली मते व जिंकलेल्या जागांचे प्रमाण २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांतील प्रमाणापेक्षा कमी आहे. तसेच २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील कामगिरीही फार नेत्रदीपक नाही. २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत ईशान्य भारतामध्ये सर्वनंद सोनोवाल हे भाजपचे अत्यंत लोकप्रिय नेते होते. तर हिमंत बिस्वा सर्मा हे भाजपचे स्टार प्रचारक व नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक आघाडीचे निमंत्रक होते. सर्वनंद सोनोवाल यांचे महत्त्व कमी करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय असलेल्या हिमंत बिस्वा सर्मा यांना भाजपने विधानसभा निवडणुकांत झुकते माप दिल्याने भाजपचा फार फायदा झालेला नाही, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.
सोनोवाल व हिमंत बिस्वा सर्मा या दोन नेत्यांनी आसाममध्ये भाजपचा जनाधार वाढविला आहे, पक्षाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे.
या आठवड्यात देणार अहवाल
आसाममध्ये आता हिमंत बिस्वा सर्मा यांना उपमुख्यमंत्री करावे व कालांतराने मुख्यमंत्रिपदी वर्णी लावावी असाही भाजप विचार करत आहे. आसामच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसंदर्भात भाजपचे केंद्रीय निरीक्षक आपला अहवाल पक्षाच्या संसदीय मंडळासमोर ठेवतील.