मिझोरममध्ये भाजपा-काँग्रेसची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:30 AM2018-04-27T00:30:55+5:302018-04-27T00:30:55+5:30
या महिन्यात चकमा स्वायत्त जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यात आली. या २० सदस्यांच्या परिषदेत सत्ताधारी काँग्रेस व भाजपाला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या.
गुवाहाटी : भाजपाने देश काँग्रेसमुक्त करण्याचा चंग बांधला असला तरी मिझोरममध्ये काँग्रेस व भाजपा हे दोन्ही पक्ष चकमा आदिवासी परिषदेतील सत्तेसाठी एकत्र आले आहेत. मिझो नॅशनल फ्रंटला (एमएनएफ) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे एनएनएफ हा भाजपाप्रणित नॉर्थ ईस्ट डेमॉक्रेटिक अलायन्सचा घटकही आहे.
या महिन्यात चकमा स्वायत्त जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यात आली. या २० सदस्यांच्या परिषदेत सत्ताधारी काँग्रेस व भाजपाला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. सर्वाधिक आठ जागा मिळवून एमएनएफ सगळ््यात मोठा ठरला. निकालानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा असा कयास होता की भाजपा व नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्समधील घटक एमएनएफ हेच सत्तेत येतील. अभिनंदन करताना शहा यांनी तसे टष्ट्वीटही केले होते. शहा म्हणाले होते की, भाजपा-एमएनएफने २० पैकी १३ जागा मिळवल्या आहेत. मिझोरममध्ये भाजपाच्या उदयाची ही सुरुवात आहे. परंतु हे घडू शकले नाही.
या वर्षाअखेरीस मिझोरममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांद्वारे काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आाहेत. परंतु काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपा नेत्यांची मनधरणी केली आणि त्यांना आघाडी करण्यासाठी राजी केले. (वृत्तसंस्था)