देशभरात आंदोलनं सुरू होताच भाजपाकडून एनआरसीबद्दलचं 'ते' ट्विट डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 05:13 PM2019-12-20T17:13:40+5:302019-12-20T17:21:24+5:30
देशभरातील वातावरण तापताच भाजपाकडून अमित शहांच्या विधानाचं ट्विट डिलीट
मुंबई: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. हा कायदा मागे घेण्याची मागणी करत देशभरात लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण तापलं असताना भाजपानं त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक जुनं ट्विट डिलीट केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा अध्यक्ष अमित शहांनी केलेलं विधान भाजपानं ट्विट केलं होतं. मात्र काल (१९ डिसेंबर) हे ट्विट काढून टाकण्यात आलं.
लोकसभा निववडणुकीवेळी प्रचार करताना एप्रिल महिन्यात अमित शहांनी एका भाषणादरम्यान राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवर भाष्य केलं होतं. आम्ही संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू करू असं अमित शहा म्हणाले होते. मात्र याच विषयावर बोलताना त्यांनी एक केलेलं विधान वादग्रस्त ठरलं. बौद्ध, हिंदू आणि शीख यांचा अपवाद वगळता आम्ही सगळ्या घुसखोरांची देशातून हकालपट्टी करू, असं शहा म्हणाले होते. त्यांचं हे विधान भाजपानं ट्विटदेखील केलं होतं. मात्र कालच भाजपानं हे ट्विट डिलीट केलं. सध्या या ट्विटचे स्क्रीनशॉट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
अमित शहांचं ट्विट डिलीट केल्यावर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी भाजपाला चिमटा काढला. भाजपाची आयटी सेल ट्विट डिलीट करू शकतं. मात्र गृहमंत्री संसदेत काय म्हणाले, हे त्यांना डिलीट करता येणार नाही, अशा शब्दांत ओब्रायन यांनी भाजपाला टोला लगावला. यानंतर काहींनी बंगाल भाजपाच्या ट्विटर हँडलकडे लक्ष वेधलं. भाजपा फॉर इंडियानं अमित शहांचं ट्विट केल्यावरही बंगाल भाजपाच्या ट्विटर हँडलवर मात्र अद्याप ते ट्विट दिसत आहे.