दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? भाजपाच्या प्रदेश प्रभारींचं मोठं विधान, म्हणाले- "तो निर्णय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:35 IST2025-02-08T14:34:19+5:302025-02-08T14:35:27+5:30
New CM from BJP, Delhi Assembly Election 2025 : तब्बल २७ वर्षांनी विजय मिळाल्यानंतर सुषमा स्वराज यांच्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत भाजपाचा मुख्यमंत्री बसणार आहे.

दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? भाजपाच्या प्रदेश प्रभारींचं मोठं विधान, म्हणाले- "तो निर्णय..."
New CM from BJP, Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार या प्रश्नाचे उत्तर शनिवारी सर्व दिल्लीकरांना मिळाले. तब्बल २७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भाजपाने दिल्लीत आपला विजय नोंदवला. दुपारी २ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकड्यांनुसार, भाजपा ४८ जागांवर आघाडीवर तर आम आदमी पक्ष (AAP) केवळ २२ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसले. यावरून दिल्लीत भाजपा बहुमतासह सरकार स्थापन करणार हे चित्र जवळपास निश्चित झाले. पण गेल्या काही महिन्यांतील ट्रेंड पाहता भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, यावर चर्चा रंगली आहे. खासदार मनोज तिवारी यांना राज्याच्या राजकारणात आणले जाईल अशी एक चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे केजरीवाल यांचा पराभव करणारे जायंट किलर प्रवेश वर्मा यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. याच दरम्यान, भाजपा दिल्ली प्रभारींकडून एक महत्त्वाची अपडेट आली आहे.
भाजपाचे दिल्ली प्रदेश प्रभारी बैजयंत पांडा यांनी सांगितले की दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले की, आमच्या पक्षाकडे सर्व राज्यांमध्ये सामूहिक नेतृत्व आहे आणि विजयानंतर आमच्यातील कोणताही कार्यकर्ता पुढे येऊन नेता होऊ शकतो. इतर पक्षांमध्ये असा प्रकार घडत नाही. आमचा पक्ष मात्र कोणालाही मोठे पद देण्यासाठी आधी जनतेची आणि आमच्या कार्यकर्त्यांची मतं विचारात घेतो. आणि मग शेवटी तो प्रस्ताव संसदीय बोर्डाकडे जातो. मग तेथे मुख्यमंत्रीपद किंवा मोठ्या पदांबाबत निर्णय घेतला जातो. त्यामुळे मला विश्वास आहे की, आमच्यकडून कुणीही विधानसभेचा नेता म्हणजेच मुख्यमंत्री बनला तरी तो एक चांगला नेताच असेल.
दरम्यान, भाजपाचा दिल्लीत विजय जवळपास निश्चित झाल्याने मुख्यमंत्री कोण या चर्चेला तुफान वेग आलेला दिसतो. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे जायंट किलर प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी अमित शाह यांची भेट घेतली. प्रवेश वर्मा यांनी यंदाच्या निवडणुकीत नवी दिल्लीतून जागा लढवताना अरविंद केजरीवाल यांना पराभवाची धूळ चारली. त्यांनी केजरीवालांचा तब्बल ३ हजारांहून जास्त मतांनी विजय मिळवला. या विजयानंतर प्रवेश शर्मा यांनी अमित शाह यांची भेट घेतली. तर दुसरीकडे भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्रीपदासाठीचे नाव निश्चित होईल, असे दिसून येत आहे.