Dadra And Nagar Haveli Bypoll: “शिवसेनेचा इतिहास पाहा; नाव महाराजांचे घेतील, पण काम मुघलांचे करतील”: फडणवीसांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 04:06 PM2021-10-26T16:06:28+5:302021-10-26T16:07:58+5:30
Dadra And Nagar Haveli Bypoll: भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक सभा घेतली.
सिल्वासा: देशात अनेकविध निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही ठिकाणी महानगरपालिका, विधानसभा निवडणुकात तर काही ठिकाणी लोकसभेच्या पोटनिवडणुसांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच आता खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचा (Dadra And Nagar Haveli Bypoll) प्रचार शिगेला पोहोचलाय. भाजप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला असून, शिवसेनेचा इतिहास पाहा, ते तिथे आहेत, तेच बरे आहे, असा टोला लगावला आहे.
शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनाच मैदानात उतरवण्यात आले आहे. तर भाजपकडून महेश गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक सभा घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर ५६ जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, अशी टीका फडणवीस यांनी केली.
नाव महाराजांचे घेतील, पण काम मुघलांचे करतील
मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? अशी विचारणा करत ते इथे आले तर नाव महाराजांचे घेतील आणि काम मुघलांचे करतील, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. आपले भवितव्य बदलण्यासाठीची ही संधी आहे. देशातील गरीब जनतेसाठी पंतप्रधान मोदींनी योजना केल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, दे मोदींनी देशात करुन दाखवले, असे कौतुकोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
आदिवासींपर्यंत मोदींचा विकास पोहोचतोय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी योजना तयार केल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली. मोदींच्या सरकारमधून दिल्लीतून जे पैसे पाठवले जातात, ते थेट गरीबांच्या खात्यात जातात. दादरा नगर-हवेलीतही प्रत्येकाला पक्की घरे दिली जातील. महाराष्ट्रात १० लाख घरे दिली आहेत. आदिवासींपर्यंत मोदींचा विकास पोहोचतोय. मोदींनी घर देताना, गॅस देताना कोणाची जात, धर्म, पंथ पाहिला नाही. आता मोदी आरोग्याची योजना गरीबांपर्यंत पोहोचवत आहेत. जे मागील ६० वर्षांत दादरा नगर-हवेलीत पोहोचले नाहीत. ते केवळ ७ वर्षांत मोदींनी पोहोचवले. आधी सत्तेच्या गल्लीत फक्त भ्रष्टाचार चालायचा. तो मोदींनी बंद केला आणि गरीबांच्या योजनांना प्राधान्य दिल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी युवा सेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दादरा नगर-हवेलीला जाणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील दादरा नगर-हवेलीत प्रचारासाठी जाणार असल्याचे सांगितले जाते आहे.