निकालातील ‘ती’ परंपरा भाजपने माेडली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 10:12 AM2024-03-25T10:12:07+5:302024-03-25T10:12:26+5:30
ज्याचे राज्यात सरकार, त्याचा व्हायचा लाेकसभेत पराभव
- ललित झांबरे
डेहराडून : भाजपाने गेल्या १० वर्षांत देशावर बहुमतासह सत्ता करताना अनेक विक्रम केले आहेत आणि त्यादरम्यान काही समजही गैरसमज असल्याचे सिद्ध केले आहे. गेल्या वेळच्या आपल्या यशाने उत्तराखंडबद्दलचा असाच एक समज त्यांनी गैरसमज असल्याचे सिद्ध केले आहे.
हा समज म्हणजे २०१९ पर्यंत असे मानले जात होते की, उत्तराखंड राज्यात ज्या पक्षाचे सरकार असते त्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत यश मिळत नाही. २००४ ते २०१४ पर्यंत झालेल्या तीन निवडणुकांमध्ये असे घडलेही होते; पण २०१९ मध्ये भाजपाने उत्तराखंडमध्ये सत्तेत असताना लोकसभेचाही आखाडा जिंकला होता. उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या पाच जागा असून, भाजपने २०१९ मध्ये या पाचही जागांवर विजय मिळवला होता.
देवभूमी म्हणून बोलले जाणारे उत्तराखंड सन २००० मध्ये अस्तित्वात आले. त्याआधी हे राज्य उत्तर प्रदेशचा भाग होते. राज्य निर्मितीनंतर उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या चार निवडणुका झाल्या आहेत.
कधीपासून झाली सुरूवात
या परंपरेची सुरुवात २००४ मध्ये झाली. त्यावेळी येथे नारायणदत्त तिवारी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे राज्य होते; पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त नैनितालचीच जागा जिंकता आली होती.
२००९ मध्ये उत्तराखंड भाजपकडे होते. त्यावेळी निवृत्त मेजर जनरल बी.सी. खांडुरी मुख्यमंत्री होते. राज्यात सत्तेत असले तरी भाजपाला त्यावेळी राज्यात लोकसभेची एकही जागा जिंकता आली नव्हती.
२०१४ च्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या हरीश रावत यांचे सरकार राज्यात सत्तेवर होते; पण देशभरात असलेली मोदी लाट देवभूमीतही बघायला मिळाली आणि भाजपाने सर्वच्या सर्व पाचही जागा जिंकल्या.
भाजप पुनरावृत्ती करणार?
राज्यात ज्याची सत्ता त्याला लोकसभेत अपयश ही मालिका अखेर २०१९ मध्ये भाजपने खंडित केली. त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपा सत्तेवर असतानाही लोकसभेच्या पाचही जागांवर कमळ फुलले. उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच राज्यात ज्याची सत्ता त्याच पक्षाला लोकसभा निवडणुकीतही यश मिळाले. आता पुन्हा राज्यात भाजपच सत्तेवर आहे, हे विशेष.