हिंदू धर्मातली लवचीकता भाजपला मान्य नाही - थरूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 02:32 AM2019-09-22T02:32:38+5:302019-09-22T02:33:05+5:30
खासदार शशी थरूर यांची टीका
पुणे : इतर कोणत्याही धर्मात नाही तेवढी लवचिकता हिंदू धर्मात आहे. दोन व्यक्तींनी एकमेकांचे विचार मान्य करून त्यांचा आदर करणे हेच खरे हिंदू धर्माचे गमक आहे. त्यातली संस्कृती आणि दाक्षिण्य ही भारतीय लोकशाहीची ताकद आहे. मात्र, दुर्दैवाने हे भाजप आणि संघ परिवाराला मान्य नाही, अशी टीका खासदार शशी थरूर यांनी केली.
पुण्यात आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये ‘व्हाय आय एम ए हिंदू’ कार्यक्रमात थरूर बोलत होते. या वेळी त्यांनी हिंदुत्ववादावर मते मांडली. ते म्हणाले, ‘मी हिंदू असण्यामागे इतरांचा नाही तर माझा स्वत:चा दृष्टिकोन आहे. या धर्मात व्यक्तीला स्वत:च्या मतानुसार धर्माचे आचरण करता येते हेच वैशिष्ट्य आहे. अशी संधी इतर कोणताही धर्म देत नाही, असेही ते म्हणाले.
नरेंद्र मोदी हे लोकशाही पद्धतीने निवडून पंतप्रधान झाले आहेत. ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना आपण देशाचे पंतप्रधान म्हणून आदर आणि सन्मान द्यायलाच हवा असेही मत थरूर यांनी व्यक्त केले.