'YES BANK लुटणाऱ्या उद्योजकांकडून भाजपाला कोट्यवधींचं डोनेशन', 'आप'ने दाखवली यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 09:17 AM2020-03-10T09:17:36+5:302020-03-10T09:20:05+5:30
हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्ट्राचाराच्या (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अटक केलेले Yes Bank चे संस्थापक राणा कपूर आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी परिचित होते
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जाचा एनपीए वाढल्याने येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सन 2017 पासून रिझर्व्ह बँक सातत्याने येस बँकेचे निरीक्षण आणि चौकशी करीत आहे. येस बँकेचा कारभार खूपच कमकुवत होता. क्रेडिट निर्णयांसोबत, मालमत्तेचे चुकीचे वर्गीकरण सुद्धा करण्यात आले होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. याप्रकरणी बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली आहे. आता, आम आदमी पक्षाकडून yes बँकेच्या थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्ट्राचाराच्या (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अटक केलेले Yes Bank चे संस्थापक राणा कपूर आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी परिचित होते. लंडनमध्ये संपत्ती जमवणारे राणा कपूर यांची भारतात देखील खूप संपत्ती आहे. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या अँटिलियाशेजारी राणा कपूरच्या कुटुंबीयांनी 127 कोटींचा बंगला विकत घेतला. देशातील बड्या उद्योजकांशी या बँकेचे मोठे आर्थिक व्यवहार झाले असून हे उद्योजकच बँकेच्या डबघाईला कारणीभूत असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
आम आदमी पक्षाच्या माहितीनुसार, अनिल अंबानी ग्रुपकडे येस बँकेचे 13 हजार कोटी रुपये आहेत. एसेल ग्रपकडे 3300 कोटींची थकबाकी आहे. तसेच, रेडियस डेव्हलपर्सकडे 1200 कोटी, डीएचएफएल ग्रुपकडे 3750 कोटी, आरकेडब्लूकडे 1200 कोटी रुपयांची थकबाकी आहे. आपचे नेते संजय सिंग यांनी फोटो शेअर करत, भाजपाच्या मित्रांनीच येस बँकेवर दरोडा टाकल्याचं म्हटलंय. तसेच भाजपाला वरील कर्जाची थकबाकी असलेल्या कंपन्यांकडून भाजपाला मोठ्या स्वरुपात देणगीही देण्यात आली आहे.
The big defaulters of #YesBank are donors of BJP. pic.twitter.com/bWKpwfEqTZ
— AAP (@AamAadmiParty) March 9, 2020
दरम्यान, खातेदारांना 50 हजार रुपये काढण्याचे लादलेले निर्बंध लवकरच संपुष्टात आणण्याची शक्यता आहे. RBI आठवड्याभरात बँकेतून 50 हजार रुपये काढण्याची मर्यादा हटवू शकते. सद्यस्थितीत ग्राहकाला खात्यातून फक्त 50 हजार रुपये काढता येत आहेत. त्याहून अधिकची रक्कम ग्राहक काढू शकत नाही. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.