मुर्मू यांना ५३५ खासदार, २,५५० आमदारांचा पाठिंबा; सात लाखांहून अधिक मते मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 11:13 AM2022-07-16T11:13:47+5:302022-07-16T11:15:18+5:30
झारखंड मुक्ती मोर्चाने गुरुवारी पाठिंबा दिल्यानंतर अपक्षांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांची संख्या २८ झाली आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या ७७६ पैकी ५३५ खासदारांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने गुरुवारी पाठिंबा दिल्यानंतर अपक्षांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांची संख्या २८ झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३१ राज्य विधानसभेच्या ४०३३ पैकी २५५० आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. मुर्मू यांंना पाठिंबा देणाऱ्या प्रादेशिक पक्षांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मतांची गोळाबेरीज केल्यास मुर्मू यांना १०.८६ लाखांपैकी ७ लाखांहून अधिक मते मिळतील आणि संख्या वाढतच जाईल. ‘आप’ आणि राज्यांतील काही छोटे पक्ष वगळता बहुतेकांनी राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू किंवा विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या बाजूने आपली भूमिका जाहीर केली आहे. ‘आप’च्या राजकीय व्यवहार समितीची या मुद्यावर शनिवारी बैठक होत आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाचाही देणार पाठिंबा
यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणाऱ्या राज्यस्तरीय पक्षांनी त्यांना सांगितले, आपण येण्याची गरज आहे; परंतु, त्यांना स्वत:च्या झारखंडसह अनेक राज्यांचा दौरा खराब हवामानामुळे रद्द करावा लागला. येथील सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाने मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने सिन्हा यांची स्थिती कठीण झाली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने त्यांना धक्का बसला; परिणामी त्यांना मुंबई दौरा रद्द केला. त्यांना आशा आहे की, त्यांनी मला मतदान केल्यास २०० खासदार आणि १४०० आमदारांचा पाठिंबा मिळेल.
खासदारांना हिरव्या, आमदारांना गुलाबी मतपत्रिका
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी, १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू व विरोधी पक्षांतर्फे यशवंत सिन्हा हे दोनच उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी खासदारांना हिरव्या व आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका देण्यात येणार आहेत.