४० पैकी ३५ जागांसाठी बिहारवर नजर! मांझी, चिराग, साहनी, कुशवाह होणार भाजपाचे सारथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 02:13 PM2023-06-15T14:13:56+5:302023-06-15T14:14:14+5:30
बिहारमध्ये PM मोदी यांच्या दोन ठिकाणी मोठ्या जाहीर सभा करण्याबाबतही चर्चा
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या व मित्रपक्षांच्या सहकार्याने बिहारमध्ये ४० पैकी ३५ जागा जिंकण्याचे ‘लक्ष्य’ ठेवले आहे. यावेळी जीतनराम मांझी, मुकेश साहनी, चिराग पासवान भाजपची नाव किनाऱ्याला लावतील.
बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागांबाबत बुधवारी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या निवासस्थानी बिहार भाजपच्या कोर नेत्यांची बैठक झाली. भाजपची व्होट बँक मजबूत करण्यासाठी पासवान, मुसहर, मल्लाह, कोरी, कुर्मी तसेच ओबीसींनाही जोडण्यावर चर्चा झाली.
एनडीए मजबूत करण्यासाठी चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी, मुकेश साहनी यांची विकासशील इन्सान पार्टी, जीतनराम मांझी यांचा हम व उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टीला एनडीएमध्ये समाविष्ट करण्याबाबतही चर्चा झाली.
पंतप्रधानांच्या दोन सभा
बिहारमध्ये मोदी यांच्या दोन ठिकाणी मोठ्या जाहीर सभा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. २३ जून रोजी पाटण्यात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांची पाटण्याबाहेर एखाद्या ठिकाणी सभा घेण्याबाबतही चर्चा झाली. बैठकीत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, सुशीलकुमार मोदी, बिहार भाजपचे प्रभारी सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.