भाजपने बंगाल व राजस्थानच्या नेत्यांना उतरवले मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 05:47 AM2023-07-22T05:47:38+5:302023-07-22T05:48:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी करीत कामकाज चालू दिले नाही.
संजय शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संसदेत मणिपूरवरील विरोधकांच्या गदारोळाला उत्तर देण्यासाठी सत्तारूढ भाजपने पश्चिम बंगाल व राजस्थानच्या नेत्यांना मैदानात उतरवले व मणिपूरसारखी स्थिती या राज्यांत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. भाजप खा. लॉकेट चटर्जी यांना तर रडू कोसळले. संसद अधिवेशनातील सलग दुसऱ्या दिवशी मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. आजही विरोधकांनी मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी करीत कामकाज चालू दिले नाही.
विरोधकांच्या मणिपूर मुद्द्याच्या उत्तरात सत्ताधारी पक्षाने पश्चिम बंगालचे नेते सुकांतो मजूमदार व लॉकेट चटर्जी यांना मैदानात उतरवून बंगालची स्थिती तर मणिपूरपेक्षाही जास्त वाईट असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. राजस्थानबाबत केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पत्रपरिषद घेतली व राजस्थानमध्ये तर काँग्रेसचे सरकार असून, मणिपूरपेक्षा जास्त वाईट स्थिती असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.
संसदेतील तिढा सोडविण्याचा प्रयत्न
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी नेत्यांशी चर्चा करून संसदेतील तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. सरकारने गृहमंत्री अमित शाह यांचे निवेदन संसदेसमोर ठेवण्याची तयारी दर्शवली. परंतु विरोधक मणिपूरचा मुद्दा सोडण्यास तयार नसल्यामुळे यावर तोडगा निघाला नाही. राज्यसभेत सरकारने नियम १७६नुसार चर्चा करण्याची तयारी दर्शवली. परंतु विरोधक नियम २६७ नुसार चर्चा करण्यावर अडून बसले होते.