भाजपाची 250 उमेदवारांची यादी तयार; अडवाणी, जोशींचं तिकीट कापणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 11:56 AM2019-03-21T11:56:45+5:302019-03-21T11:59:33+5:30
तरुणांना संधी देण्यासाठी दिग्गजांना डच्चू मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली: प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं जाहीर केलेली असली, तरी अद्याप सत्ताधारी भाजपानं उमेदवारांची घोषणा केलेली नाही. भाजपानं जवळपास 250 उमेदवारांची यादी तयार केली आहे. ही यादी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. भाजपाच्या संसदीय समितीनं उमेदवार यादी तयार केली असून अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. त्यामुळे मार्गदर्शक मंडळातील लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना तिकीट मिळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी. सी खंडुरी आणि बी. एस. कोश्यारी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानं तरुणांना संधी द्या, अशी भूमिका या दोन्ही नेत्यांनी घेतली आहे. माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र (2014 मध्ये देवरियामधून विजयी) आणि लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा यांनीदेखील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी स्वत:हून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं आता मार्गदर्शक मंडळातील नेत्यांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार स्वत: माघार घेणार की तरुणांना संधी देण्यासाठी पक्षाकडून त्यांची तिकीटं कापली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या अडवाणींचं वय 91 वर्षे, तर जोशींचं वय 85 वर्षे आहे. 2014 मध्ये या दोन्ही नेत्यांचा समावेश मार्गदर्शक मंडळात करण्यात आला. पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या नेत्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काही महिन्यांपूर्वी घेतला आहे.