भाजपाकडून 'सुवर्ण'संधी! पॅरालिम्पिक पदकविजेता खेळाडू लोकसभेच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 08:23 PM2024-03-02T20:23:02+5:302024-03-02T20:36:48+5:30

BJP first List for Lok Sabha Elections 2024: सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 

BJP first List for Lok Sabha Elections 2024 Two-time Paralympics gold medallist Devendra Jhajharia is bjp candidate from churu seat in rajasthan, read here details  | भाजपाकडून 'सुवर्ण'संधी! पॅरालिम्पिक पदकविजेता खेळाडू लोकसभेच्या रिंगणात

भाजपाकडून 'सुवर्ण'संधी! पॅरालिम्पिक पदकविजेता खेळाडू लोकसभेच्या रिंगणात

Lok Sabha Elections: भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपाने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित असलेले भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांना राजस्थानमधील चुरू येथून तिकीट दिले आहे. पक्षाने शनिवारी ही घोषणा केली. भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित झालेल्या झाझरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे देवेंद्र हे देशातील पहिले पॅरा ॲथलीट आहेत. झाझरिया यांनी तीन ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदके जिंकली आहेत. त्यांच्या चमकदार कामगिरीमुळेच त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळालेले झाझरिया हे राजस्थानचे पहिलेच खेळाडू आहेत. गेल्या वर्षी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकले होते. यापूर्वी अथेन्स २००४ आणि रिओ २०१६ मध्ये झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत देवेंद्र यांनी देशासाठी सुवर्ण पदक पटकावले होते.

भाजपाकडून 'सुवर्ण'संधी!
देवेंद्र यांना भारत सरकारकडून क्रीडा विश्वातील सर्वोच्च असलेला प्रमुख ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. याआधी त्यांना पद्मश्री पुरस्कार, विशेष क्रीडा पुरस्कार (२००४), अर्जुन पुरस्कार (२००५), राजस्थान खेलरत्न, महाराणा प्रताप पुरस्कार (२००५), मेवाड फाऊंडेशनचा प्रतिष्ठित अरावली सन्मान (२००९) असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. खेळाशी संबंधित विविध समित्यांचे ते सदस्य राहिले आहेत.

देवेंद्र यांचा जन्म १० जून १९८१ रोजी चुरू येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. प्रतिकूल वातावरण आणि प्रतिकूल परिस्थितीला देवेंद्र यांनी कधीही त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण होऊ दिले नाही. आपल्या ध्येयाला वाहून घेतलेल्या देवेंद्र यांनी लाकडी भाला बनवला आणि स्वत: सराव सुरू केला. १९९५ मध्ये त्यांनी शालेय स्पर्धेतून भालाफेक सुरू केली. कॉलेजमध्ये शिकत असताना बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये पदके जिंकल्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून पाहिले नाही. १९९९ मध्ये सर्वसाधारण गटात खडतर स्पर्धा असूनही राष्ट्रीय स्तरावर भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकणे ही देवेंद्र यांच्यासाठी मोठी कामगिरी होती. अशाप्रकारे यशाची मालिका सुरू झाली अन् प्रत्यक्षात देवेंद्र यांचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न सुरू झाले. 

झाझरिया लोकसभेच्या रिंगणात
दरम्यान, २००२ च्या बुसान एशियाडमध्ये देवेंद्र यांनी सुवर्ण पदक जिंकले होते. २००३ च्या ब्रिटिश ओपन गेम्समध्ये देवेंद्र यांनी भालाफेक, शॉट पुट आणि तिहेरी उडी या तिन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके जिंकली. २००४ च्या अथेन्स पॅरा ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून देवेंद्र यांचे नाव देशाच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. या खेळात त्यांनी ६२.१५ मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून आपली छाप सोडली. रिओमध्ये ६३.९७ मीटर भालाफेक करून हा विश्वविक्रम स्वतः देवेंद्र यांनी मोडला होता. नंतर देवेंद्र यांनी २००६ मध्ये मलेशिया पॅरा एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले. २००७ मध्ये तैवान येथे पार पडलेल्या पॅरा वर्ल्ड गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले आणि २०१३ साली ल्योन (फ्रान्स) येथे झालेल्या थलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी सुवर्ण पदक जिंकले.

Web Title: BJP first List for Lok Sabha Elections 2024 Two-time Paralympics gold medallist Devendra Jhajharia is bjp candidate from churu seat in rajasthan, read here details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.