भाजपनं 2024 साठी तयार केला 'फॉर्म्युला 144'; असा मिळू शकतो मोठा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 01:59 PM2022-05-26T13:59:32+5:302022-05-26T14:00:28+5:30
यात केंद्रीय मंत्र्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क अभियानाचा समावेश आहे.
देशातील लोकसभा निवडणुका 2024 मध्ये होणार आहेत. पण भारतीय जनता पक्षाने (भाजप) आतापासूनच या निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. भाजपने 2019 मध्ये पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या 144 लोकसभा जागांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. भाजप सरचिटनीस बीएल संतोष यांनी या योजनेसंदर्भात माहिती दिली आहे. यात केंद्रीय मंत्र्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क अभियानाचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात भाजप या 144 लोकसभा जागा आणि या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा जागांसंदर्भात संपूर्ण माहिती मिळवेल. यानंतर, भजप या जागांवर बूथ मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करेल.
भाजप या जागांवर पुढील 18 महिने काम करण्यासाठी तीन स्तर तयार करेल. सर्वात पहिले एक केंद्रीय समिती असेल, यात राष्ट्रीय नेत्यांचा समावेश असेल. ही समिती संपूर्ण कार्यक्रमावर लक्ष ठेवेल. दुसऱ्या स्तरावर, राज्य समिती असेल, ही समिती योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करेल. तर तिसऱ्या स्तरावर, केंद्रीय मंत्र्यांसह एक क्लस्टर समिती संपूर्ण कामकाजाची पाहणी करेल. तसेच केंद्र आणि राज्य समित्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी थेट सहभागी असेल.
या कार्यक्रमानुसार, पक्षाचे संगटनात्मक प्रभारी दर 15 दिवसातून एक रात्र प्रत्येक लोकसभा सीटवर घालवेल. प्रत्येक लोकसभा प्रभारी पहिले दोन महिने लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक रात्र घालवतील. या लोकसभा टीमची जबाबदारी जात, पक्षाच्या बाजूने आणि विरोधात असलेल्य मुद्द्यांच्या आधारे डेटा तयार करण्याची असेल. अशा अनेक जबाबदाऱ्या या टीमवर सोपवण्यात आल्या आहेत.