दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 03:49 PM2024-11-17T15:49:11+5:302024-11-17T15:54:04+5:30
AAP : रविवारी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचे माजी आमदार अनिल झा यांना आपचे सदस्यत्व दिले.
नवी दिल्ली : दिल्लीत आज दोन मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. एकीकडे आम आदमी पार्टीचे (आप) नेते कैलाश गेहलोत यांनी पक्षाचा राजीनामा दिला, तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार अनिल झा यांनी आपमध्ये प्रवेश केला. रविवारी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचे माजी आमदार अनिल झा यांना आपचे सदस्यत्व दिले. तसेच, अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजपचे लोक फक्त मोठं-मोठं बोलतात. त्यांना वाटते की जनता मूर्ख आहे, परंतु जनतेला सर्व काही माहित आहे. आमच्या येण्याने स्वर्ग आला असे नाही, दिल्लीत अजून खूप काम बाकी आहे, ते पूर्ण होईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. याशिवाय, जे काही काम झाले ते गेल्या १० वर्षातच झाले हेही सत्य आहे. याआधी दोन्ही सरकारने कोणतेही काम केले नाही, असेही ते म्हणाले.
पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत दोन सरकारे आहेत. एक राज्य सरकार आणि एक केंद्र सरकार. दिल्लीच्या संबंधात दोन्ही सरकारांकडे सत्ता आणि संसाधने आहेत. केंद्राकडे प्रचंड अधिकार आहेत. दिल्ली सरकारने १० वर्षात पूर्वांचल समाजासाठी एवढी कामे केली आहेत, पण भाजपवाल्यांनी एक गोष्ट सांगावी की, त्यांनी या समाजासाठी काय केले, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.
दरम्यान, दिल्ली सरकारचे ज्येष्ठ मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, त्यांनी आपला सुद्धा रामराम ठोकला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत कैलाश गेहलोत यांनी हे पाऊल उचलले. दिल्लीच्या आतिशी सरकारमध्ये ते परिवहन मंत्री म्हणून कार्यरत होते. कैलाश गेहलोत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून लोकांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राजधानीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत कैलाश गेहलोत यांचा राजीनामा आपला मोठा धक्का समजला जात आहे.