चीनने भारताच्या ४ हजार चौरस किमी जागेवर अतिक्रमण केले; सुब्रमण्यम स्वामींची हायकोर्टात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 05:05 PM2023-10-10T17:05:07+5:302023-10-10T17:08:29+5:30
Subramanian Swamy: पंतप्रधान मोदी चीनच्या मुद्द्यावर मौन बाळगत असल्यासंदर्भात विरोधकांसह आता भाजपमधील नेते विचारणा करू लागले आहेत.
Subramanian Swamy: गेल्या काही वर्षापासून भारत आणि चीन या दोन देशांमध्ये लडाख येथील सीमेवरून तीव्र संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर तोडगा काढण्याचा दोन्ही देशांकडून प्रयत्न केला जात आहे. चीनच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्याचा सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच आता भाजपमधूनही चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनाबाबत प्रश्न विचारले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. पंतप्रधान भारतातील विरोधी पक्षांवर हल्लाबोल करतात. मात्र चीनचे नाव घेताच त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाही. चीनने आमच्या हजारो चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे. यावर पंतप्रधान मोदी अजूनही एक शब्दही बोलू शकत नाहीत, या शब्दांत स्वामी यांनी निशाणा साधला.
चीनकडून ४ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर अतिक्रमण
चीनच्या मुद्द्यावर स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. चीनने ४ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप स्वामी यांनी आपल्या याचिकेत केला आहे. याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तरही मागवले आहे. दुसरीकडे, सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावरही टीका केली आहे. परराष्ट्रमंत्री यांचा काही उपयोग नाही. ते फक्त आपल्या मालकांची भाषा बोलतात, अशी टीका केली होती.
दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी हे एकेकाळी जनता दलाचे मोठे नेते होते. मात्र, नंतर भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणांनी प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेचे तिकीटही दिले. स्वामींचा कार्यकाळ संपल्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पुन्हा राज्यसभेवर पाठवले नाही.