भाजपने तयार केली निवडणुकीची व्यूहरचना, दोन वर्षांत लोकसभेसह अनेक निवडणुका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 13:01 IST2022-07-05T13:00:47+5:302022-07-05T13:01:19+5:30
BJP : पक्षाने देशभर तिरंगा अभियानाद्वारे २० कोटी लोकांना पक्षाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानादरम्यान निवडणुकीला सामोरे जात असलेली राज्ये, शहरे आणि गावांमध्ये प्रभात फेरीच्या रुपात तिरंगा यात्रा काढण्यात येतील.

भाजपने तयार केली निवडणुकीची व्यूहरचना, दोन वर्षांत लोकसभेसह अनेक निवडणुका!
- शरद गुप्ता
नवी दिल्ली : हैदराबादेत नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसह १८ राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना तयार केली आहे. यात पक्ष कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उचलण्यात येणारी पावले आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉर तसेच राम जन्मभूमीसारख्या भावनात्मक मुद्द्यांचा समावेश आहे.
पक्षाने देशभर तिरंगा अभियानाद्वारे २० कोटी लोकांना पक्षाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानादरम्यान निवडणुकीला सामोरे जात असलेली राज्ये, शहरे आणि गावांमध्ये प्रभात फेरीच्या रुपात तिरंगा यात्रा काढण्यात येतील. या यात्रांद्वारे युवकांना पक्षाशी जोडण्यावर विशेष भर देण्यात येईल. याशिवाय एक बुथ २०० कार्यकर्ता हे अभियान राबविण्यात येईल. ज्या बुथवर भाजपचा प्रभाव कमी आहे, तेथे अधिक लक्ष केंद्रित करण्यात येईल.
यासाठी अशा ५० हजार बुथची यादी तयार करण्यात आली आहे. भाजप आता आफली शहरी पक्ष ही प्रतिमा बदलू इच्छितो. त्यामुळे पक्षाचे नेते गावोगाव जाऊन केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करतील. उत्तर प्रदेशात लाभार्थी व्होट बँकेच्या यशानंतर भाजप आता हा प्रयोग देशभर करणार आहे. भाजपला शहरी पार्टी ही प्रतिमा बदलायची आहे, त्यासाठी यापुढे ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करण्याचेही ठरविण्यात आले आहे.
बुथ स्तरावर सोशल मीडियाचा होणार वापर!
- केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळत असलेल्या नागरिकांची संख्या ३० कोटींहून अधिक आहे, हा लाभ मतांत रुपांतरित करण्यासाठी बुथ स्तरावरील कार्यकर्ते त्यांच्या सतत संपर्कात राहतील.
- निवडणीला सामोरे जात असलेल्या राज्यांतील युवक-युवतींना पक्षाशी जोडण्यासाठी येते बुथ स्तरावर सोशल मीडिया, डिजिटल समूह तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.