सूरतमध्ये रॅली न काढण्यासाठी भाजपाने दिली होती पाच कोटींची ऑफर - हार्दिक पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 02:02 PM2017-12-04T14:02:27+5:302017-12-04T15:27:41+5:30
'सुरतमधील रॅलीत अनुपस्थित राहावं यासाठी भाजपाकडून पाच कोटींची ऑफर होती. सुरतमधील एका व्यवसायिकाने मला फोन करुन ही ऑफर दिली होती. ते आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, पण यावेळी आपल्याला एकता काय असते त्यांना दाखवून द्यायचं आहे', असं हार्दिक पटेलने सांगितलं
सूरत - गुजरातमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून पाटीदार नेता हार्दिक पटेलने रविवारी सुरतमध्ये रॅली काढली होती. या रॅलीसाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र या रॅलीला अनुपस्थित राहण्यासाठी आपल्याला पाच कोटींची ऑफर देण्यात आली होती असा धक्कादायक खुलासा हार्दिक पटेलने केला आहे. सुरतमधील प्रचारसभेत बोलताना हार्दिक पटेलने हा खुलासा केला. याआधी त्याने एक रोड शो काढला होता.
'सुरतमधील रॅलीत अनुपस्थित राहावं यासाठी भाजपाकडून पाच कोटींची ऑफर होती. सुरतमधील एका व्यवसायिकाने मला फोन करुन ही ऑफर दिली होती. ते आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, पण यावेळी आपल्याला एकता काय असते त्यांना दाखवून द्यायचं आहे', असं हार्दिक पटेलने सांगितलं. प्रचारसभेआधी झालेल्या रोड शोमध्ये 13 लाख लोक सहभागी झाले होते असा दावा हार्दिक पटेलने केला आहे. काँग्रेसला समर्थन देणा-या हार्दिक पटेलने भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच राष्ट्रवादी, आप आणि अपक्ष उमेदवार हे भाजपाने रचलेला सापळा असून त्याला बळी पडू नका असंही आवाहन समर्थकांना केलं आहे.
सूरत में आयोजित जन क्रांति महासभा में उमड़ पड़ा जनसैलाब,जनता का पावर क्या हैं वो भाजपा को आज पता चल गया,सूरत में मुझे यह सभा और रेली नहीं करने के लिए करोड़ों की ओफ़र भी की गई थी,लेकिन मेरा ईमान पैसो नहीं ख़रीदा जा सकता pic.twitter.com/9RE883VjxH
— Hardik Patel (@HardikPatel_) December 3, 2017
'तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून पाच मिनिटं काढा आणि गुजरातमधील इतर भागांत राहणा-या तुमच्या सर्व नातेवाईकांना फोन करुन भाजपाला मतदान करु नका असं सांगा. मला 19 डिसेंबरला अहंकारी सरकारचा गुजरातच्या सहा कोटी लोकांनी पराभव केल्याची हेडलाइन पहायची आहे. आपलं भाजपासोबत काही शत्रुत्व नाही, पण पाटीदार आंदोलनावेळी आपल्याला दिलेला त्रास आपण कसे विसरु शकतो', असं हार्दिकने म्हटलं आहे.
हार्दिक पटेल पुढे म्हणाला की, 'हा वाजपेयी - केशुभाई यांचा भाजपा पक्ष नाही, जो गरिब आणि शेतक-यांचा विचार करायचा. हा अमित शहांचा पक्ष आहे ज्यामध्ये गुंड भरले आहेत'. यावेळी हार्दिक पटेलने गेल्या 21 वर्षात विकासावर कोणतंही काम न केल्यावरुनही टीका केली. 'गुजरातमध्ये फक्त दोन सरकारी रुग्णालयं आहेत, तीदेखील काँग्रेसची सत्ता असताना बांधली गेली. भाजपाचं काय ? सुरतमध्ये इतक्या वर्षात त्यांनी एक साध हॉस्पिटल किंवा सरकारी शाळा का नाही बांधली ?', असा सवाल राहुल गांधींनी विचारला.