"जेएनयूचं नाव बदला, स्वामी विवेकानंदाचं नाव द्या; विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल"
By कुणाल गवाणकर | Published: November 16, 2020 08:14 PM2020-11-16T20:14:12+5:302020-11-16T20:14:40+5:30
पंतप्रधान मोदींनी जेएनयूतील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर भाजप महासचिवांची मागणी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच आठवड्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे महासचिव सी. टी. रवी यांनी जेएनयूचं नामांतर करण्याची मागणी केली आहे. जेएनयूचं नाव बदलून स्वामी विवेकानंद विद्यापीठ करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जेएनयूचं नाव बदलण्याची मागणी सी. टी. रवी यांनी ट्विटद्वारे केली आहे. 'स्वामी विवेकानंद कायम भारताच्या विचारधारेसाठी ठामपणे उभे राहिले. त्यांची मूल्य भारताचं सामर्थ्य दाखवतात. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं नाव बदलून त्याला स्वामी विवेकानंदांचं नाव देणं उचित ठरेल. देशभक्त संताचं जीवन पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल,' असं मत रवी यांनी व्यक्त केलं आहे. रवी यांच्याकडे नुकतीच पक्षानं गोवा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे.
It is Swami Vivekananda who stood for the "Idea of Bharat". His philosophy & values signify the "Strength of Bharat".
— C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) November 16, 2020
It is only right that Jawaharlal Nehru University be renamed as Swami Vivekananda University.
Life of Bharat's patriotic Saint will inspire generations to come.
याआधीही झालीय नामांतराची मागणी
जेएनयूचं नामांतर करण्याची मागणी याआधीही झाली आहे. वायव्य दिल्लीचे भाजप खासदार हंसराज हंस यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये जेएनयूचं नाव बदलण्याची मागणी केली होती. जेएनयूला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्याची मागणी हंस यांनी केली होती. जेएनयूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा आक्षेप
भाजप महासचिव सी. टी. रवी यांनी केलेल्या नामांतराच्या मागणीला जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. 'जेएनयू म्हणजे केवळ नाही तर ५० वर्षांचा इतिहास आहे. इथे समाजातल्या प्रत्येक वर्गाला शिक्षणाची संधी मिळते. भाजपला जेएनयूबद्दल इतकीच कळकळ असेल तर त्यांनी देशातल्या प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात जेएनयूसारखं विद्यापीठ उभारावं,' असं मत जेएनयूचा विद्यार्थी सनी धीमाननं व्यक्त केलं.