एक्झिट पोलने भाजपला मोठा धक्का; बिगरभाजप पक्षांच्या एकजुटीला बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 09:00 AM2023-05-11T09:00:20+5:302023-05-11T09:00:45+5:30

२०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आघाडी स्थापन करण्यासाठी १९ विरोधी पक्षांच्या काही बैठका याआधी झाल्या आहेत.

BJP gets big shock with exit poll; Strengthen the unity of non-BJP parties | एक्झिट पोलने भाजपला मोठा धक्का; बिगरभाजप पक्षांच्या एकजुटीला बळ

एक्झिट पोलने भाजपला मोठा धक्का; बिगरभाजप पक्षांच्या एकजुटीला बळ

googlenewsNext

हरीश गुप्ता

नवी दिल्ली :कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांत भाजप विजयी होणार नसल्याचा निष्कर्ष काही विश्वासार्ह जनमत चाचण्यांतून काढण्यात आल्याने बिगरभाजप पक्षांमध्ये उत्साह संचारला आहे. या निवडणुकांचा १३ मे रोजी निकाल असून, त्या दिवशी जनमत चाचण्यांचे निष्कर्ष खरे ठरल्यास बिगरभाजप पक्षांची एकजूट होण्याच्या प्रक्रियेस आणखी वेग येणार आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आघाडी स्थापन करण्यासाठी १९ विरोधी पक्षांच्या काही बैठका याआधी झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदारसंघात भाजपविरोधात विरोधी पक्षांनी एकमताने आपला उमेदवार उभा करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याची रणनीती ठरविण्यासाठी या पक्षांमध्ये चर्चाही झाली. कर्नाटकमध्ये भाजप हरला तर तो निकाल विरोधी पक्षांसाठी बूस्टर डोस ठरणार आहे. भाजपला सातत्याने लक्ष्य करणाऱ्या गांधी घराण्यातील व्यक्ती व आणखी काही पक्षांचे हात कर्नाटकमध्ये भाजप हरल्यास मजबूत होणार आहेत.

भाजपची रणनीती अयशस्वी?

काही राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असून, त्यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्या पक्षाच्या प्रमुखांना जुळवून घ्यावे लागेल अशी स्पष्ट चिन्हे आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकांत स्थानिक प्रश्नांऐवजी राष्ट्रीय प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून प्रचार करण्याची भाजपची रणनीतीदेखील प्रभावी ठरली नाही असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. बी. एस. येडीयुरप्पा यांना मंत्रिपदावरून हटवून बोम्मई यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री करण्याचा भाजपने घेतलेला निर्णयही फारसा फायदेशीर ठरणार नाही, असे काही निरीक्षकांचे मत आहे.

‘बाजूला सारलेल्या भाजप नेत्यांना होईल आनंद’

भाजपने विविध राज्यांत आपल्या पक्षातील ज्या नेत्यांना फार महत्त्व दिलेले नाही, ज्यांना बाजूला सारले, तिकिटे दिली नाहीत अशा लोकांना कर्नाटकबाबतच्या एक्झिट पोलचे निष्कर्ष ऐकून आनंद होण्याची शक्यता आहे. राजस्थानात वसुंधराराजे सिंधिया, छत्तीसगडमध्ये रमणसिंह, मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्यासह काही भाजप नेत्यांकडे पक्षश्रेष्ठींनी काहीसे दुर्लक्ष केले आहे.

बजरंग दलाचा मुद्दा प्रभावी ठरला नाही

कर्नाटकमध्ये काँग्रेस विजयी होईल असा ॲक्सिस-इंडियाच्या जनमत चाचणीचा निष्कर्ष आहे. बजरंग दलावर बंदी घालण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचा मुद्दा भाजपने निवडणूक प्रचारात लावून धरला होता. मात्र, त्या मुद्याचा काहीही उपयोग झाला नाही, हेही अशा प्रकारच्या निकालांनी सिद्ध होण्याची शक्यता आहे.

Web Title: BJP gets big shock with exit poll; Strengthen the unity of non-BJP parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.