भाजपा पंजाबमध्ये देणार ‘तूप-साखर’
By admin | Published: January 23, 2017 01:02 AM2017-01-23T01:02:53+5:302017-01-23T01:03:01+5:30
पंजाबमधील गरीब नागरिकांना भाजप आता ‘तूप-साखर’ देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे रविवारी जाहीरनामा
जालंधर : पंजाबमधील गरीब नागरिकांना भाजप आता ‘तूप-साखर’ देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे रविवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानुसार गरिबांना दर महिन्याला स्वस्तात शुद्ध तूप आणि साखर देणार आहे. दहशतवादाची झळ बसलेल्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणाही भाजपने केली आहे.
अरुण जेटली म्हणाले की, पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुधारणावाद याला प्राधान्य देण्यात येणार आहे. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी सध्या आटा-डाळ योजना चालविण्यात येत आहे. आता निळ्या कार्डधारकांना दर महिन्याला २५ रुपये किलोने दोन किलो शुद्ध तूप आणि १० रुपये किलो दराने पाच किलो साखर देण्यात येणार आहे.
पंजाबी भाषेतील या १६ पानी जाहीरनाम्यात प्रत्येक गरीब कुटुंबाला घर, तर दलित आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांना भूखंड देण्याचा शब्द देण्यात आला आहे. प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय शेतकरी उत्पन्न आयोगाची स्थापना करण्यात येणार असून, छोटे शेतकरी आणि छोटे उद्योगपती यांना अचानक मृत्यू आल्यास त्या कुटुुंबाला दहा लाख रुपयांची मदत देण्यात येईल.
मुलींना पीएच.डी.पर्यंत मोफत शिक्षण, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, सेवानिवृत्तीची मर्यादा ६० वर्षे करणार, पत्रकारांना घरे आदी आश्वासने यात देण्यात आली आहेत. (वृत्तसंस्था)