...तर तुमची अवस्था अडवाणींसारखी होईल; भाजपाचा पदाधिकाऱ्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 10:28 AM2019-07-16T10:28:38+5:302019-07-16T10:31:12+5:30
भाजपाकडून पदाधिकाऱ्यांना कडक शब्दांमध्ये इशारा
नवी दिल्ली: सध्या भाजपाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विचारधारेबद्दल मार्गदर्शन दिलं जात आहे. विचारधारेशी प्रामाणिक राहा, अन्यथा परिणाम भोगा, असा स्पष्ट इशारा पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. विचारधारेच्या विरोधात गेल्यास पदावरुन हटवण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना भाजपाकडून प्रशिक्षणादरम्यान दिल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षकांकडून भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दरम्यान भाजपाचे 'पितामह' लालकृष्ण अडवाणी यांचं उदाहरण दिलं जात आहे. 'नवभारत टाइम्स'नं हे वृत्त दिलं आहे.
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान अडवाणींच्या २००५ च्या पाकिस्तान दौऱ्याची आठवण करुन दिली जात आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांना धर्मनिरपेक्ष म्हटल्यानं अडवाणी यांना भाजपाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं होतं, हा संदर्भ भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिला जात आहे. पक्षातील कोणतीही व्यक्ती विचारधारेपेक्षा श्रेष्ठ नाही, अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष जे. पी. राठोड यांनी मार्गदर्शन शिबिरातील अडवाणींच्या उल्लेखावर भाष्य केलं.
पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांवर झालेल्या कारवाईचा संदर्भ देऊन विचारधारेचं महत्त्व पटवून दिलं जात असल्याचं राठोड म्हणाले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अडवाणींचं उदाहरण दिलं जात आहे. पक्षाच्या विचारधारेविरोधात विधान केल्यानं अडवाणींची अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती, याची आठवण आम्ही प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्यांना करुन देत आहोत, असं राठोड यांनी सांगितलं.
काय म्हणाले होते अडवाणी?
२००५ मध्ये अडवाणी पाकिस्तानला गेले होते. त्यावेळी त्यांनी जिन्ना यांना धर्मनिरपेक्ष म्हटलं होतं. जिन्ना हिंदू-मुस्लिम एकतेचे दूत होते, अशी स्तुतीसुमनं अडवाणींनी उधळली होती. यानंतर अडवाणींना पक्षाध्यक्ष पदावरुन दूर करण्यात आलं. अडवाणी यांच्या एका विधानामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला. जिन्ना यांचं कौतुक केल्यानं अडवाणी यांची राजकीय घसरण सुरू झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. २००९ मध्ये भाजपानं अडवाणींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं. मात्र त्या निवडणुकीत भाजपाचा पराभव केला. यंदा भाजपानं अडवाणींना गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून तिकीटदेखील दिलं नाही.