भाजपा देशातील सर्वांत श्रीमंत पक्ष, इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाले 1300 कोटी, तर काँग्रेसला...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 09:03 AM2024-02-11T09:03:48+5:302024-02-11T09:05:21+5:30
अहवालानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात भाजपाला एकूण 2120 कोटी रुपये मिळाले, त्यापैकी 61 टक्के निवडणूक रोख्यांमधून मिळाले.
नवी दिल्ली : सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला (भाजपा) 2022-23 मध्ये निवडणूक रोख्यांद्वारे (इलेक्टोरल बॉन्ड) अंदाजे 1300 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम याच काळात विरोधी पक्ष काँग्रेसला निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेल्या रकमेपेक्षा सातपट अधिक आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पार्टीच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात भाजपाला एकूण 2120 कोटी रुपये मिळाले, त्यापैकी 61 टक्के निवडणूक रोख्यांमधून मिळाले.
2021-22 या आर्थिक वर्षात पार्टीला एकूण 1775 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. 2022-23 मध्ये पार्टीचे एकूण उत्पन्न 2360.8 कोटी रुपये होते, जे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1917 कोटी रुपये होते. दुसरीकडे, काँग्रेसने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 171 कोटी रुपये कमावले, जे 2021-22 या आर्थिक वर्षात 236 कोटी रुपयांपेक्षा कमी होते. भाजपा आणि काँग्रेस हे मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत.
राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्ष समाजवादी पार्टी (SP) ने 2021-22 मध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 3.2 कोटी रुपये कमावले होते. 2022-23 मध्ये या निवडणूक रोख्यांद्वारे समाजवादी पार्टीला एकही पैसा मिळाला नाही. आणखी एक प्रादेशिक पार्टी तेलुगु देसम पार्टीला 2022-23 मध्ये निवडणूक रोख्यांद्वारे 34 कोटी रुपये मिळाले, जे मागील आर्थिक वर्षातील रकमेपेक्षा 10 पट जास्त आहे.
भाजपाने गेल्या आर्थिक वर्षात 237 कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळवले, जे 2021-22 च्या तुलनेत 135 कोटी रुपये अधिक आहे. 'निवडणूक आणि सर्वसाधारण प्रचारा'वरील एकूण खर्चापैकी, भाजपाने विमान आणि हेलिकॉप्टरच्या वापरासाठी 78.2 कोटी रुपये दिले, जे 2021-22 मध्ये खर्च केलेल्या 117.4 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच, भाजपाने उमेदवारांना आर्थिक सहाय्य म्हणून 76.5 कोटी रुपये दिले, जे 2021-22 मध्ये 146.4 कोटी रुपये होते.