'या' राज्यातील भाजप सरकारने फटाक्यावर घातली बंदी, खरेदी-विक्री करता येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 01:22 PM2021-10-24T13:22:11+5:302021-10-24T13:22:41+5:30
Firecracker Ban: अवैध फटाके साठवणाऱ्यांना पकडण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची असेल.
गुवाहाटी: दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण, त्यापूर्वीच असामच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने (PCB) राज्यातील हिरवे वगळता सर्व प्रकारचे फटाके फोडणे आणि विकण्या पूर्णपणे बंदी घातली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण(NGT) च्या निर्देशांचे पालन करताना, सणासुदीच्या काळात वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश लागू राहील. पीसीबीचे अध्यक्ष अरुप कुमार मिश्रा म्हणाले की, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील सर्व उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांना सूचनांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
अवैध फटाके साठवणाऱ्यांना पकडण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची आहे. पीसीबीने केवळ सल्ला आणि सूचना जारी केल्यामुळे पोलिस आणि प्रशासनाने फटाक्यांचा वापर थांबला आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राज्यात केलेल्या दैनंदिन कारवाईचा अहवालही पीसीबीला सादर करावा. तसेच, दिवाळीच्या दिवशी लोक दोन तास हिरवे फटाके फोडू शकतात, अशी माहिती मंडळाने दिली आहे.
दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी
ऑक्टोबरच्या सुरुवातीला राजधानी दिल्लीत हवेच्या गुणवत्तेत संभाव्य बिघाड लक्षात घेता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच राष्ट्रीय राजधानीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावर बंदीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "गेल्या 3 वर्षांपासून दिवाळी दरम्यान दिल्लीच्या प्रदूषणाची धोकादायक परिस्थिती पाहता, यावेळी देखील सर्व प्रकारचे फटाके वापरावर बंदी असेल."