मणिपूरमध्येही भाजपा सरकार?
By admin | Published: March 12, 2017 03:09 PM2017-03-12T15:09:50+5:302017-03-12T19:28:06+5:30
भाजपाला गोवा आणि मणिपूरमध्ये मात्र निराशेचा सामना करावा लागला होता . मात्र या दोन्ही राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने भाजपाने सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
इंफाळ, दि. 12 - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठे बहुमत मिळालेल्या भाजपाला गोवा आणि मणिपूरमध्ये मात्र निराशेचा सामना करावा लागला होता . मात्र या दोन्ही राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने भाजपाने सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाचे महासचिव राम माधव यांनी मणिपूरमध्ये सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा पक्षाला मिळेल असा दावा केला आहे.
एकीकडे गोव्यातील मगोप आणि गोवा फॉर्वड ब्लॉक या पक्षांशी बोलणी सुरू असतानाच मणिपूरमध्येही काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. "मणिपूरमध्ये भाजपाला चांगला जनाधार मिळाला आहे. आता इतर पक्षांनी सहकार्य केल्यास सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला आकडा आम्ही गाठू," असे माधव यांनी सांगितले. तसेच मणिपूरमधील जनतेने ओकाराम इबोबी सिंग यांच्या सरकारविरोधात कौल दिला आहे, असा दावाही माधव यांनी केला आहे.
मणिपूरमधील सत्ताधारी काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या असल्या तरी त्या पक्षाला तिथे बहुमतापेक्षा ४ जागा कमी मिळाल्या आहेत. दुसरीकडे भाजपाने 22 जागा जिंकल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँग्रेसलाच सरकार स्थापनेसाठी राज्यपाल बोलावण्याची शक्यता आहे. मात्र यापुढे तेथील सरकार अस्थिर राहण्याचीच चिन्हे आहेत. मात्र तिथे सलग चौथ्यांदा काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. मात्र भाजपानेही सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्याने पूर्वोत्तर राज्यातील सत्तेचे गणित चुरशीचे बनले आहे.