"2024 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन होईल", केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 04:34 PM2023-06-01T16:34:48+5:302023-06-01T16:35:48+5:30
गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी आणि भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधानांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रोजगार निर्माण करण्याची गरज आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा विजय मिळवेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले. एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, सरकारने गेल्या नऊ वर्षांत देशाच्या विकासासाठी चांगले काम केले आहे. तसेच, गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी आणि भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधानांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रोजगार निर्माण करण्याची गरज आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
एका प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले, "2024 मध्ये आम्ही जिंकणार आहोत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही जिंकू. आम्ही चांगले काम केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करू. देशाच्या विकासासाठी जनता आम्हाला निवडून देईल." दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 543 पैकी 303 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 52 जागा जिंकता आल्या.
याचबरोबर नितीन गडकरी म्हणाले की, भारताची सर्वात मोठी समस्या भूक, गरिबी आणि बेरोजगारी आहे. ग्रीन हायड्रोजन, एलएनजी आणि वीज यासारख्या स्वच्छ इंधनांवर चालणाऱ्या बांधकाम उपकरणांसाठी परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार केला जात आहे. तसेच, ते पुढे म्हणाले की, बांधकामाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता बांधकामाचा खर्चही कमी करण्याची गरज आहे.