अलाहाबादनंतर आता 'या' शहराचं नाव बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 12:24 PM2018-10-21T12:24:44+5:302018-10-21T12:30:10+5:30
उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद शहराचे प्रयागराज असे नामकरण केल्यानंतर आता आणखी एका शहराचं नाव बदलण्याची शक्यता आहे.
शिमला - उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद शहराचे प्रयागराज असे नामकरण केल्यानंतर आता आणखी एका शहराचं नाव बदलण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमलाचं नाव बदलण्यात येण्याचे संकेत हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
शिमला या प्रसिद्ध शहराचे नाव बदलून ते 'श्यामला' करण्याचा सरकार विचार करेल असे हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले आहे. तसेच राजधानीचे नाव बदलण्याच्या मागणीबाबत सरकार जनतेच्या भावना जाणून घेणार असल्याचेही मुख्यंत्र्यांनी जाहीर केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विश्व हिंदू परिषद शिमला शहराचे नाव बदलण्याबाबत मागणी करत आहे. मात्र 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी शिमला हे नाव जगभर प्रसिद्ध असल्याचे सांगत ती मागणी फेटाळली होती. हिंदुत्ववादी संघटनांची ही जूनी मागणी असून अलाहाबादचे प्रयागराज असे नाव झाल्यानंतर या मागणीने आता जोर धरला आहे.