भाजपाने अच्छे दिनचे आश्वासन दिलेच नव्हते - केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर
By admin | Published: August 24, 2015 09:09 PM2015-08-24T21:09:40+5:302015-08-24T21:09:40+5:30
भाजपाने 'अच्छे दिन'चे आश्वासन कधी दिलेच नव्हते असे अजब विधान भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - शेअर बाजारातील घसरण व कांद्यामुळे महागाई वाढत असतानाच भाजपाने 'अच्छे दिन'चे आश्वासन कधी दिलेच नव्हते असे अजब विधान भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केले आहे. तोमर यांच्या विधानावरुन आता भाजपाची खिल्ली उडवली जात आहे.
सोमवारी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना एका पत्रकाराने अच्छे दिन संदर्भात प्रश्न विचारला. यावर तोमर म्हणाले, भाजपाने अच्छे दिनचे आश्वासन कधी दिलेच नव्हते. सोशल मिडीयावर 'अच्छे दिन येतील, राहुल गांधी आजीच्या घरी जातील' असे अभियान सुरु होते व काही जणांनी हे वाक्य थेट भाजपाच्या तोंडी टाकून दिले असे अजब स्पष्टीकरणही त्यांनी दिले. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनावरुन केंद्रीय मंत्र्यानेच घुमजाव केल्याने भाजपावर टीकेची झोड उठली आहे. यापूर्वी काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करु ही घोषणा म्हणजे फक्त निवडणुकीतील जुमला होता असे अमित शहा यांनी म्हटले होते. यावरुनही भाजपावर टीका झाली होती.