'त्या'वेळी भाजपाने माझ्या हत्येचा कट आखला होता, मायावतींचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 11:46 AM2017-09-19T11:46:17+5:302017-09-19T11:48:35+5:30
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सोमवारी मेरठ येथे बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.
मेरठ, दि. 19 - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सोमवारी मेरठ येथे बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. सहारनपूरमध्ये हिंसा भाजपाने घडवली आणि या हिंसेमध्ये माझ्या ह्त्येचा कट आखला होता असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाने इव्हिएममध्ये गडबड करून निवडणुका जिंकल्याच्या आरोपाचा पुनर्उच्चार केला. नोटबंदी आणि जीएसटीवरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
'महाराणा प्रताप जयंतीच्या वेळी हत्येचा कट आखला होता. या कार्यक्रमात फुलन देवी यांचा मारेकरी शेर सिंह राणा हा देखील होता. दलितांवर होत असलेल्या अत्याचारामुळे मायावती सहारनपूरमध्ये येतीलच त्यावेळी हिंसेदरम्यान हत्या करायची असा कट होता. पण त्यांच्या कटाबाबत आधीच माहिती मिळाली आणि त्यांचा कट उधळला' असं मायावती म्हणाल्या. दलितांवरील अत्याचाराबाबत बोलू न दिल्याने नाराज झालेल्या मायावतींनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. तसंच भाजपाच्या सरकारमध्ये दलितांवर अत्याचार वाढत आहेत आणि आरक्षण संपवण्याचा कट रचण्याचाही आरोप केला.