भाजपने टीम बदलली! महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांना नड्डांनी हटवले; तावडे, मुंडे, रहाटकर यांचे स्थान कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 06:51 AM2023-07-30T06:51:30+5:302023-07-30T06:51:47+5:30
स्वत: सी. टी. रवी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक जिंकू शकले नव्हते.
संजय शर्मा -
नवी दिल्ली : २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपल्या ३८ सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून हटविले आहे. विनोद तावडे यांना पुन्हा राष्ट्रीय महासचिव केले आहे तर पंकजा मुंडे व विजया रहाटकर यांना राष्ट्रीय सचिवपदावर पुन्हा स्थान दिले आहे. सी. टी. रवी यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून हटवून हाच संदेश दिला आहे की, कर्नाटकमध्ये बी. एस. येदीयुरप्पा यांच्याविरोधात राजकारण करण्याचा परिणाम भाजपला कर्नाटकमध्ये सरकार गमावून भोगावा लागला. स्वत: सी. टी. रवी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक जिंकू शकले नव्हते.
पंकजा यांचे मन वळविण्याचा प्रयत्न
पंकजा मुंडे यांच्या पवित्र्यानंतर त्यांचे मन वळविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे. त्या मध्य प्रदेशच्या सह प्रभारीही आहेत व नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राचे सुनील देवधर यांना राष्ट्रीय सचिव पदावरून हटविले आहे. ते आंध्रप्रदेशचे सहप्रभारी होते.
विजयवर्गीय नवे प्रभारी? -
सी. टी. रवी यांच्याकडे असलेला महाराष्ट्राचा प्रभार कैलास विजयवर्गीय यांच्याकडे सोपविला जाण्याची दाट शक्यता आहे. विजयवर्गीय हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू मानले जातात. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांच्या नावाचाही पर्याय भाजपश्रेष्ठींपुढे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.