भाजपने सुब्रमण्यम स्वामींचे दोन कार्यक्रम केले रद्द
By Admin | Published: June 28, 2016 08:08 AM2016-06-28T08:08:21+5:302016-06-28T08:08:21+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुब्रमण्यम स्वामींना सूचक इशारा दिल्यानंतर आता स्वामींना आवरण्यासाठी भाजपने पावले टाकायला सुरुवात केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुब्रमण्यम स्वामींना सूचक इशारा दिल्यानंतर आता स्वामींना आवरण्यासाठी भाजपने पावले टाकायला सुरुवात केली आहे. भाजपने स्वामींचे दोन कार्यक्रम रद्द केले आहेत. या कार्यक्रमात स्वामी वक्ते म्हणून बोलणार होते. स्वामींची आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरील टीका अयोग्य आहे असे पंतप्रधानांनी सोमवारी एका इंग्रजी वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही असे मोदींनी सांगितले. पंतप्रधानांकडून सिग्नल मिळाल्यानंतर आता भाजपअंतर्गत स्वामींना रोखण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून निर्देश मिळत नसल्याने स्वामींच्या विरोधात बोलण्यास पक्षात कोणी धजावत नव्हते. पण आता मोदींनी भूमिका स्पष्ट केल्यामुळे स्वामींसाठी तो एक इशारा आहे. स्वामींनी आधी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले. राजन यांच्यावर झालेल्या आरोपानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
राजन देशविरोधी असल्याचा आरोप स्वामींनी केला होता. सोमवारी एका इंग्रजी वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत मोदींनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांची देशभक्ती इतर कोणाहूनही कमी नाही. ते देशभक्त आहेत व त्यांनी प्रशंसनीय काम केले आहे. भारतावर त्यांचे प्रेम आहे आणि ते कुठेही गेले तरी यापुढेही भारताच्या हितासाठीच काम करीत राहतील, असे स्पष्टपणे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह स्वपक्षातील इतरही वाचाळवीरांना गप्प केले.