भाजपने दोन राजघराण्यातील वंशजांना दिले तिकीट; त्रिपुराच्या 'महाराणी' आणि म्हैसूरचा 'राजा' पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 08:27 AM2024-03-14T08:27:37+5:302024-03-14T08:33:04+5:30

लोकसभा निवडणुकीची घोषणा काहीच दिवसात होणार आहेत. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काल भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली.

BJP has given tickets to two royal family leaders for the Lok Sabha elections | भाजपने दोन राजघराण्यातील वंशजांना दिले तिकीट; त्रिपुराच्या 'महाराणी' आणि म्हैसूरचा 'राजा' पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात

भाजपने दोन राजघराण्यातील वंशजांना दिले तिकीट; त्रिपुराच्या 'महाराणी' आणि म्हैसूरचा 'राजा' पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात

लोकसभा निवडणुकीची घोषणा काहीच दिवसात होणार आहेत. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काल भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली, कालच्या यादीत ७२ जणांची नावे आहेत, कर्नाटक , महाराष्ट्र , मध्यप्रदेश , तेलंगणा , उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा , दादर नगर हवेली या राज्यातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.या यादीत भाजपने दोन राजघराण्यातील वंशजांना उमेदवारी दिली आहे. त्रिपुरातील महाराणी कृती सिंह देबबर्मा आणि म्हैसुरचे यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांच्या नावांचा समावेश आहे, ते पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. 

भाजपने आतापर्यंत आपल्या दोन यादीत एकूण २६७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यापैकी २ उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या जागी पक्षाने अजुनही दुसरी  नाव जाहीर केलेले नाही. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून २०-२०, गुजरातमधून ७, हरियाणा आणि तेलंगणामधून ६-६, मध्य प्रदेशमधून ५, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश आणि त्रिपुरातून २-२ उमेदवारांची नावे आहेत. दादर आणि नगर हवेलीतून प्रत्येकी १ उमेदवार जाहीर झाला आहे.

पंकजा, मुनगंटीवार, गडकरी, गोयल लोकसभेच्या रिंगणात; भाजपच्या दुसऱ्या यादीत राज्यातील २० जण

महाराणी कृती सिंह देबबरमा या टिपरा मोथा पार्टीचे संस्थापक आणि त्रिपुरा राजघराण्याचे प्रमुख प्रद्योत माणिक्य देबबरमा यांची मोठी बहीण आहे. आगामी लोकसभानिवडणूक त्या पहिल्यांदाच लढवणार आहेत. त्यांच्या घराण्यातील इतर सदस्य काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. त्यांचे वडील, किरीट बिक्रम देबबरमा, तीन वेळा खासदार होते आणि त्यांची आई, बिभू कुमारी देवी, दोन वेळा काँग्रेसच्या आमदार होत्या आणि त्यांनी त्रिपुराचे महसूल मंत्री म्हणूनही काम केले होते. 

किरीट बिक्रम किशोर माणिक्य यांची धाकटी मुलगी कृती यांनी शिलाँग येथील लोरेटो कॉन्व्हेंटमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी गुजरातमध्ये पर्यावरण शिक्षण आणि व्यवस्थापन कार्यक्रमात पदविका तसेच वरिष्ठ व्यवस्थापन आणि ग्रामीण विकास अभ्यासक्रम केला. १९९२ ते १९९४ या काळात त्या शिलाँगमध्ये प्राणी कल्याण अधिकारी होत्या. 

छत्तीसगडच्या माजी कावर्धा राज राजघराण्यातील योगेश्वर राज सिंह यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कृती सिंह देबबरमा त्यांच्या भावाच्या पक्षाच्या सदस्या आहेत, पण भाजपच्या चिन्हाखाली निवडणूक लढवणार आहेत. टिपरा मोथा अलीकडेच त्रिपुरातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाल्यानंतर देबबरमा यांची उमेदवारी आली आहे. कृती सिंह यांची बहीण कुमारी प्रज्ञा देबबर्मा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्रिपुरा पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

म्हैसूरच्या राजघराण्यातील वंशजाला उमेदवारी 

३२ वर्षीय यदुवीर हे जयरामचंद्र वाडियार यांचे नातू आहेत. जयरामचंद्र वाडियार हे म्हैसूरचे २५ वे राजा होते. यदुवीर त्यांचे काका आणि वाडियार घराण्याचे २६ वे राजा श्रीकांतदत्त नरसिंहराज वाडियार यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. श्रीकांतदत्त नरसिंहराज वाडियार चार वेळा म्हैसूरमधून खासदार झाले आहेत. यदुवीर यांना २०१५ मध्ये तत्कालीन म्हैसूर राजघराण्याचे प्रमुख म्हणून राज्याभिषेक करण्यात आला होता. यानंतर ते वाडियार घराण्याचे २७वे 'राजा' बनले. यदुवीर यांना त्यांचे पती श्रीकांतदत्त वाडियार यांच्या निधनानंतर प्रमोदा देवी वाडियार यांनी दत्तक घेतले होते. 

यदुवीर यांचे सुरुवातीचे शिक्षण बंगळुरूच्या विद्यानिकेतन शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी इंग्रजी साहित्य आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत आणि राजघराण्याचा प्रभाव असलेल्या म्हैसूर मतदारसंघातून भाजपने त्यांना तिकीट दिले आहे.

Web Title: BJP has given tickets to two royal family leaders for the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.