भाजपला कधी पावलेच नाहीत ‘हे’ देव, सोमनाथ पावणार का?
By यदू जोशी | Published: November 27, 2022 09:13 AM2022-11-27T09:13:53+5:302022-11-27T09:14:16+5:30
जिंकण्यासाठी धार्मिक सर्किटची मोहीम
यदु जोशी
अहमदाबाद : हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाला गुजरातमधील प्रमुख धार्मिक स्थळे असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पराभवाचे चटके अनेकदा सहन करावे लागले आहेत. यावेळी पराभवांची मालिका खंडित करण्याचा चंग पक्षाने बांधला आहे. पक्षाने त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करीत त्यासाठी मिशन धार्मिक सर्किट ही गुप्त मोहीम हाती घेतली आहे.
दांता : बनासकांठा जिल्ह्याच्या दांता विधानसभा मतदारसंघात येणारे अंबाजी माता मंदिर हे लाखो गुजराती बांधवांचे श्रद्धास्थान. इथे १९९८ पासून २०१७ पर्यंत काँग्रेसने विजय मिळविला. दोन वेळा आमदार असलेले कांती खराडी पुन्हा काँग्रेसचे उमेदवार आहेत. भाजपने लधुभाई पारघी हा नवा चेहरा दिला आहे.
खेडब्रह्मा : साबरकांठा जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचे अतिप्राचीन धार्मिक स्थळ. इथे २४ वर्षांपासून काँग्रेस जिंकत आहे. तीन वेळचे आमदार अश्विन कोतवाल यावेळी मात्र भाजपचे उमेदवार आहेत. तुषार चौधरी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत.
चोटीला : सुरेंद्रनगरमध्ये असलेले माताजी का मंदिर हे प्राचीन श्रद्धास्थान चोटीला मतदारसंघात येते. इथे पाच निवडणुकीत केवळ २०१२ साली भाजपने विजय झाला. काँग्रेसने विद्यमान आमदार ऋत्विक मकवाना यांना, तर भाजपने शमजी चौहान यांना संधी दिली आहे.
जमालपुरा : भगवान जगन्नाथाचे मंदिर जमालपुरा मतदारसंघात येते. भाजपला इथेही विजयाची प्रतीक्षा आहे. विद्यमान आमदार इम्रान खेडावाला काँग्रेसचे उमेदवार आहे त तर भाजपचे भूषण भट्ट मैदानात आहेत.
सोमनाथ पावणार का?
प्रभास पाटण : प्रख्यात असे सोमनाथ मंदिर प्रभास पाटण मतदारसंघात असून तेथे गेल्या पाचपैकी तीन विधानसभेत काँग्रेस जिंकली. २०१२ मध्ये काँग्रेसकडून जिंकलेले जश्या बारड २०१७ मध्ये भाजपकडून लढले पण सोमनाथ पावले नाहीत, काँग्रेसचे विमल चुडासामा जिंकले, तेच यावेळीही उमेदवार आहेत. भाजपने मानसिंह परमार हा नवा चेहरा दिला आहे.