राजस्थानात राजेंचे शक्तिप्रदर्शन! विष्णू देव साय हाेणार छत्तीसगडचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 05:38 AM2023-12-11T05:38:57+5:302023-12-11T05:40:13+5:30
मध्य प्रदेशचा आज ठरणार
रायपूर/जयपूर : भाजपने जिंकलेल्या तीनपैकी दाेन राज्यांचे मुख्यमंत्री काेण हाेणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तर, छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी भाजपचे ज्येष्ठ आदिवासी नेते विष्णू देव साय यांची निवड करण्यात आली आहे. राजस्थानात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी शक्ति प्रदर्शन सुरूच ठेवले आहे. रविवारी देखील १३ आमदारांनी त्यांची भेट घेतली.
रायपूर येथे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची दुपारी येथे बैठक झाली. यात पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने नियुक्त केलेले निरीक्षक केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम उपस्थित होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी साय यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला व प्रदेशाध्यक्ष अरुण साव, ज्येष्ठ नेते ब्रिजमोहन अग्रवाल यांनी त्याला अनुमोदन दिले.
माजी केंद्रीय मंत्री साय हे सुरगुजा विभागातील कुनकुरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. भाजपने या विभागातील सर्व १४ जागा जिंकल्या आहेत. या बैठकीत साय यांची एकमताने भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या आमदारांनी घेतली वसुंधरा राजेंची भेट
nराजस्थानमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी पक्षाच्या काही नवनिर्वाचित आमदारांनी रविवारी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. वसुंधरा राजे या दिल्लीहून परतल्यानंतर आमदार त्यांची भेट घेत आहेत.
nअजय सिंह, बाबू सिंह यांच्यासह सुमारे १० आमदार राजे यांच्या निवासस्थानी पोहोचले. मुख्यमंत्रिपदासाठी त्या आघाडीवर आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पक्षाचे संसदीय बोर्ड मुख्यमंत्र्यांच्या नावावर अंतिम निर्णय घेणार आहे. पक्षाने यापूर्वीच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तीन निरीक्षकांची घोषणा केली आहे. ते साेमवारी जयपूर येथे दाखल हाेऊ शकतात.
मध्य प्रदेशात काय सुरू? विधिमंडळ पक्षाची आज बैठक
भोपाळ : मध्य प्रदेशातील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची सोमवारी विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी बैठक होणार आहे. सोमवारी दुपारी ४ वाजता बैठक सुरू होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, असे एका आमदाराने सांगितले. पक्षाचे निरीक्षक सकाळी ११ वाजता पाेहाेचण्याची अपेक्षा आहे.
मोदींची गॅरंटी पूर्ण करणार : विष्णू देव साय
मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर साय पत्रकारांना म्हणाले, “मुख्यमंत्री या नात्याने मी सरकारच्या माध्यमातून मोदींची हमी (भाजपचे निवडणूकपूर्व आश्वासन) पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.
राज्यातील १८ लाख घरे (प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत) मंजूर करणे हे त्यांच्या सरकारचे पहिले काम असेल.
निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने शेतकऱ्यांना ३,१०० रुपये प्रतिक्विंटल दराने प्रति एकर २१
क्विंटल धान खरेदी व महिलांना वर्षाला १२ हजार रुपये देण्यासह अनेक आश्वासने दिली आहेत.